Home > News Update > राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचे थैमान; लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचे थैमान; लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीचे थैमान; लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली
X

औरंगाबाद : 'गुलाब' चक्रीवादळाने मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत अतिवृष्टीने अक्षरशः दाणादाण उडवून दिल्याचे पाहायला मिळाले, अनेक जिल्ह्यांमध्ये काल सलग दुसऱ्या दिवशी पूरपरिस्थिती कायम होती. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुर आल्याने राज्यात लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यात तर पिकांची अत्यंत वाईट स्थिती झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून गेल्याने बळीराजा हतबल झाला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.

मराठवाड्यात अनेक ठिकाणी कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपासून कपाशीला अतिवृष्टीचा फटका बसत आहे. काही प्रमाणात कडधान्यांची पिके देखील अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. ५० लाख हेक्टर पेरण्यांच्या तुलनेत ५० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत लातूर व उस्मानाबाद हे जिल्हे नुकसानीच्या यादीत नव्हते. मात्र मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे या जिल्ह्यातही नुकसान झाले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल दिली. गेल्या दोन दिवसांतील अतिवृष्टीने मराठवाड्यातील ११ लाख हेक्टरवरील पिकांचे तर राज्याच्या अन्य भागात ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. असं वड्डेवार म्हणाले. सोबतच राज्यातील किती जिल्हे अतिवृष्टीग्रस्त आहेत, प्रत्यक्ष नुकसान किती झालेले आहे, याची माहिती युद्धपातळीवर गोळा केली जात असल्याचेही ते म्हणाले. ही माहिती मिळाल्यानंतरच कोणत्या जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करायचा, याबाबतचा निर्णय शासन घेईल. केंद्र सरकारने अतिवृष्टीसाठी राज्याला मदत करावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला जातो. पण प्रतिसाद मिळत नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Updated : 30 Sep 2021 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top