Home > News Update > कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
X

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज(दि.28) आणि उद्या (दि 29) या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुलाब चक्रीवादळाचे आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसणार आहेत.

येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक भागासह कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे, सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीचा भातशेतीला धोका पोहचण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. मुंबई,ठाणे, विदर्भात प्रभाव कमी असणार आहे, तर उद्या उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रमध्ये प्रभाव राहणार आहे.

या कालावधीमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन रायगड जिल्हा व जिल्हा तसेच तालुका प्रशासन उपाययोजनांसह सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.

दरम्यान नागरिकांनी या काळात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये , अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता राहील. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या 3-3 रांगा करू नये. ऐकेरी वाहतूक सुरू राहील, याची दक्षता घ्यावी, वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अतिवृष्टीमध्ये दरड कोसळण्याची शक्यता असल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.

आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी बसणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये , घरामध्ये पाणी शिरले असेल आणि पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा , आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल तर तात्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे ,घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा , झाडे इत्यादी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे ,

आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे,आपल्या जवळ दैनंदिन लागणारी औषधे, रॉकेलवर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू ठेवाव्यात ,मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत, अतिवृष्टीच्या बाबत मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा, रेडिओसाठी बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात, अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील , समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी, दरडग्रस्त गावांमधील नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी जाऊन आश्रय घ्यावा, अतिवृष्टी होत असल्याने पाणी पातळी वाढत असेल तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, पाऊस पडत असताना मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये , विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये मोबाईलचा वापर करू नये , ग्रामकृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी,आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे मदत आवश्यक असल्यास आपले ग्रामपंचायत तहसील कार्यालयात संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02141 228473 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02141 222097 या क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Updated : 28 Sep 2021 11:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top