उद्याच मंत्रीपदाचा राजीनामा देतो, बच्चू कडू यांचे मोठं विधान
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले. त्यावेळी बच्चू कडू यांच्या राजीनाम्याच्या मागणी करण्यात आली.
X
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे न होता मुंबईत झाले. त्यामुळे विदर्भावर अन्याय होत असल्याची भावना राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यातच विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. तर त्यांनी मंत्री बच्चू कडू यांनी राजीनाम्याची मागणी केली. त्यावरून मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो, असे विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यापार्श्वभुमीवर गेल्या आठ दिवसांपासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्राणांतिक उपोषण करत आहेत. त्यामुळे रात्री भर पावसात राज्यमंत्री बच्चू क़डू यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र प्राणांतिक उपोषणाला आठ दिवस उलटून गेले तरी मागण्या मान्य न झाल्याने जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यावरून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, तुम्ही इथं माझ्या राजीनाम्यासाठी बसले आहेत की न्यायासाठी? हे बरोबर नाही. मात्र तुमची इच्छा असेल तर मी उद्याच मंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, मला मंत्रीपदाची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी उद्याच राजीनामा देतो. बच्चू कडू सर्वांचा बाप आहे. तसेच 16 मार्च रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत तोडगा काढला जाईल, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिली.