Home > News Update > मुंबई व इतर शहरे का बुडतात? सतत दुर्घटना का घडतात?

मुंबई व इतर शहरे का बुडतात? सतत दुर्घटना का घडतात?

मुंबई व इतर शहरे का बुडतात? सतत दुर्घटना का घडतात?
X

या पावसाळ्यात मुंबईत दुर्घटनांची मालिका चालू आहे. नागरिकांचे खुप हाल होताहेत. रेल्वे व महामार्ग बंद झाल्याने याची व्याप्ती वाढते व मुंबईपासुन दूर असलेल्यांना देखील याचा फटका बसतो. बुडण्याची काही मुख्य कारणे लक्षात घेऊ.

मुंबईच्या सन १९६४ च्या विकास आराखड्यातील गृहिताप्रमाणे अर्धा पाऊस जमिनीकडून शोषला जाईल. मात्र मुंबईच्या काँक्रिटीकरणामुळे हे गृहित मोडले गेले आहे.

सन १९९८-९९ सालात आलेला बृहन्मुंबई महानगर पालिकेचा पहिला पर्यावरण अहवाल म्हणतो की मुंबईतील बहुतांश क्षेत्राचे १०० % काँक्रिटीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पृष्ठभागावर साठते किंवा वाहते. जमिनीत मुरत नाही. पूर येतो.

६४ च्या पहिल्या विकास आराखडय़ानुसार मुंबईत दर एक हजार माणसांमागे चार एकर जमीन, क्रीडांगणे वा उद्यानाच्या स्वरूपात मोकळी जागा हवी. परंतु सन १९९१ चा अहवाल म्हणतो की मुंबईतील अशा मोकळ्या जागेचे प्रमाण आता फक्त ०•०३ एकर एव्हढेच उरले आहे. त्यानंतरच्या काळात ते किती कमी झाले असेल त्याची वाचकांनी कल्पना करावी.

मुंबई, सागरात केलेल्या भरावांवर उभी आहे याचे कौतुक केले जाते. सन १७८४ सालात वरळी व गिरगाव ही बेटे जोडणा-या सागरातील पहिल्या भरावाचे ( रेसकोर्सपासुन पायधुणीपर्यंत ) काम सुरू झाले. हा विकास हीच दुर्घटना होती. या प्रत्येक भरावात व त्यासाठी दगड व माती मिळविण्यासाठी केलेल्या डोंगराच्या नाशामुळे सागरातील व डोंगरावरील असाधारण जंगल व जैव विविधता नष्ट झाली. त्याचबरोबर महापूराकडे वाटचाल होत राहिली.

मुंबईच्या बहुतेक भागांतील पर्जन्य व मलनि:स्सारण यंत्रणा सन १९३० व ४० च्या दरम्यान बांधली गेली. या यंत्रणांच्या, पाणी बाहेर सोडणाऱ्या मुखांपासून काही अंतरावर सर्वात मोठ्या भरतीच्या पाण्याची रेषा होती. तरच पाणी सागरात सोडले जाणे शक्य होते. परंतु नंतर विकासाच्या नशेत सागरात भराव होतच राहिले. या यंत्रणा बांधल्यानंतरच्या प्रत्येक भरावाने भरती रेषा जमिनीच्या दिशेने ढकलली गेली व पूराच्या दिशेने वाटचाल झाली. उदा. वांद्रे पूर्व व पश्चिमेच्या सरकारी वसाहती, नरिमन पॉईंट, लोखंडवाला काँम्प्लेक्स, पश्चिम उपनगरांचे भराव, वांद्रे - कुर्ला संकुल इत्यादी भराव. यातील शेवटच्या 'वांद्रे - वरळी' सागरी पुलाच्या, मिठी नदीला गाडणाऱ्या, सागरात जाण्यापासुन अडवणार्या भरावाने व खांबांनी, मुंबईसाठी एका मोठ्या दुर्घटनेची व्यवस्था करून ठेवली आहे. काँक्रीटीकरणाला व भरावांना दोष देण्याऐवजी पावसाला व भरत्यांना नाहक दोष दिला जात आहे. २६ जुलै २००५ रोजी महापूराच्यावेळी सायंकाळी दुपारी साधारण ३• ३० पासुन रात्री १०• ३० वाजेपर्यंत मोठी ओहोटी होती. भरती नव्हे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. या आंधळ्या विकासाचे समर्थक प्रसारमाध्यमांद्वारे जनतेची दिशाभूल करतात याची जाणीव असावी.

उत्तरेकडील बोरिवलीच्या जंगलातील तुळशी, विहार व पवई या तीनही तलावांच्या पाणलोट क्षेत्रापासुन ते दक्षिणेकडे एल्फिन्स्टन, लोअर परळ पर्यंत व पूर्वेला घाटकोपरच्या तीन खाडी टेकड्यांपासुन ते पश्चिमेस सागराला खेटून असलेल्या आर्य समाज, सांताक्रूझ भागांपर्यंतचे पावसाचे पाणी मिठी नदी व तिच्या उपनद्यांतुन माहीमच्या खाडीत येते. या खाडीची सागराचे व पावसाचे पाणी साठवण्याची अर्धी क्षमता सुमारे १००० एकर भराव ( त्यापैकी सुमारे ७०० एकर मॅनग्रोव्ह गाडून ) करून नष्ट केली गेली. तेथून ते पाणी माहीम व वांद्रे या मूळ बेटांमधील माहीम काॅजवेच्या पुलाखालून पुढे माहीमच्या उपसागरात येणाऱ्या प्रभादेवी, दादर - शिवाजी पार्क, माहीम व वांद्रे भागांतील पाण्यासह वरळी व वांद्रे या भूशिरांमधील भागांतून अरबी समुद्रात शिरते. या पाण्याला 'सी लिंक' प्रकल्प अडवतो. हे सर्व विकासाच्या नावे झाले.

माहीमची खाडी व माहीमचा उपसागर हे मिठी नदीच्या मुखाचे, मॅनग्रोव्हचे जंगल असलेले, शहराच्या गाभ्यातील क्षेत्र हा मुंबईची मूळ बेटे आणि उपनगरे यामधील दुवा आहे. शहराच्या जीवनरेखा असलेल्या तीनही रेल्वे माहीमच्या खाडीच्या खाजण क्षेत्रातून जातात. पूराच्या दुर्घटनांच्या निवारणाच्या द्रृष्टीने तो अतिशय महत्वाचा आघातशोषक आहे. परंतु याची जाणीव नियोजनकर्त्यांना नाही.

केवळ मुंबईच नाही तर जगातील सर्व आधुनिक शहरे त्यांच्या निसर्गविरोधी वर्तनामुळे व विकासामुळे बुडत आहेत. नागपूरातही तेच घडत आहे. याला तापमानवाढीने अत्यंत विध्वंसक परिमाण दिले आहे. २६ जुलैला 'मुंबई', त्यानंतर २८ ऑगस्टला 'न्यू ऑर्लीन्स व त्या पाठोपाठ 'शांघाय' सन २००५ मधे बुडाली.

अमेरिकेत 'ह्यूस्टन' शहरासह पूर्व किनारपट्टीवर थैमान घालणारे 'हार्वे' नाव दिलेले अभूतपूर्व अतिवृष्टी करणारे ताशी सुमारे २४० कि मी वेगाचे चक्रीवादळ आठवडाभरात दोनदा आदळले. अशावेळी खाड्या, खाजणे, नदीमुखे भरावाखाली गाडण्याची व सागरी रस्ते व भुयारी रेल्वे, रस्ते करण्याची भयंकर किंमत अमेरिकेला मोजावी लागत आहे.

तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी जर्मनीतील बाॅन येथे झालेल्या युनोच्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते जाहीर झाले आहे. एव्हढा 'कार्बन डाय ऑक्साईड' वायू वातावरणात साठला आहे की, त्याच्या उष्णता शोषण्याच्या गुणधर्मामुळे तापमान वाढतच राहणार आहे. कार्बन उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश तात्काळ न थांबवल्यास मानवजात व जीवसृष्टी या शतकात नष्ट होणार आहे. म्हणजे *औद्योगिकरण व शहरीकरण हा शाप ठरला आहे.

महासागरांचे पाणी आणि पर्वत व धृव प्रदेशांवरील बर्फाची, वाढत्या प्रमाणात वाफ होत आहे. वातावरणातील हजारो वर्षांची रूढ अभिसरण पध्दती मोडली आहे. प्रचंड प्रमाणावरील वाफेचे अनियमित वितरण होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होताना ऐतिहासिक स्वरूपात अनेक महिने वा वर्षांत होणारा पाऊस एका दिवसात किंवा काही तासांत पडत आहे.* त्याला वादळाची साथ मिळाल्यास जणू प्रलय होत आहे. शहरे 'उष्णता बेट' परिणामामुळे कमी दाबाचा पट्टा तयार करून याला आमंत्रण देत आहेत. बर्फ वितळल्यामुळे होणार्‍या सागराच्या पातळीतील वाढीमुळे मुंबई, न्यूयाॅर्कसह जगातील सर्व शहरी, ग्रामीण किनारपट्ट्या येत्या १५-२० वर्षांत पाण्याखाली जाणार आहेत. आपल्याकडे मात्र तापमानवाढीला अधिक वेग देणाऱ्या २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याच्या चर्चा जोरात चालू आहेत. आमचे उद्योग व वित्तीय क्षेत्र भ्रमात आहे. जणू ते मुंबई नावाच्या एका वेगळ्या ग्रहावर आहेत. प्रसारमाध्यमे हितसंबंधामुळे किंवा त्यांचा सहभाग असल्यामुळे

याला हातभार लावत आहेत. आपले हित अर्थव्यवस्था व आधुनिक तंत्रज्ञानकेंद्री जीवनशैली जपण्यात नसून जीवन जपण्यात आहे हे या सर्वांनी वेळ न गमावता लक्षात घ्यावे.

मुंबईत २६ जुलै २००५ ला झालेली ऐतिहासिक वृष्टी व महापूर हा तापमानवाढीचा परिणाम होता. नासाने व युनोच्या 'आय पी सी सी' ने हे नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईचा काँक्रिटीकरणरूपी विकास थांबवायला हवा. मेट्रो प्रकल्प व त्यातही 'मेट्रो - 3' हा भुयारी रेल्वे प्रकल्प व 'सागरी रस्ता' हे प्रकल्प ताबडतोब रद्द करण्याची गरज आहे. *माती व मान्सूनपेक्षा मोटारींना महत्व देणे ही चूक आहे. कारच्या टायरना माती लागू नये म्हणून बहुतेक इमारती व सोसायट्यांमधील जमीन काँक्रीट वा लाद्यांनी आच्छादली जाते. हे संकटाला निमंत्रण आहे.

वांद्रे - कुर्ला संकुल, मिठी नदीवर व अर्थातच खाडीतील सर्वांत खोल भागावर बांधले आहे. ते बुडू नये म्हणून त्याची व त्यातील रस्त्याची उंची वाढवली. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून आणणारे उत्तरेकडील कलानगर, सरकारी वसाहत इ. भाग खालच्या पातळीला गेले. तेथील इमारतींच्या तळ मजल्याच्या वर संकुलाच्या रस्त्याची पातळी आहे. असाच प्रकार सागरी रस्त्यामुळे पूर्ण मुंबईबाबत घडणार आहे. मुंबईतील पाणी बाहेर पडणार नाही. असा रस्ता म्हणजे देखील दुर्घटनेला समजुन उमजून आमंत्रण आहे.

आम्ही वरळी-वांद्रे सागरी पुल प्रकल्पाविरूध्द प्रखर आंदोलन केले. मच्छीमारांनी वांद्रे भूशिराच्या जवळ समुद्रात, क्रेनमधुन टांगलेल्या एक - दोन टन वजनाच्या मोठ्या दगडांखाली सतत आठ -दहा दिवस होड्या व बोटी लावुन, जीव धोक्यात घालून भराव थांबवला. मुंबई वाचवण्यासाठी वांद्रे व वरळी या भूशिरांमधील भागांत व प्रभादेवीच्या समुद्रात भराव करू दिला नाही. माहीम काॅजवेच्या पश्चिमेकडील मिठी नदीला अडवत असलेला भरावाचा काही भाग व सागरी पातमुख प्रकल्पाच्या भिंती काढुन टाकावयास लावल्या. माहीमच्या खाडीत झोपडपट्ट्या करण्याचे प्रयत्न थांबवले. म्हणून मिठी नदी बर्‍याच प्रमाणात मोकळी झाली व मुंबईची जलसमाधी टळली. २६ जुलै २००५ च्या दुर्घटनेत होणारे लाखो लोकांचे मरण टळले. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.

मुंबईला आता doing ची नसून undoing ची गरज आहे. सी लिंक प्रकल्प मुंबईसाठी संकट आहे. तो बंद करून काढून टाकावा. माहीम काॅजवे ते वांद्रे भूशिरापर्यंत केलेला भराव व त्यावरील रस्ता ( येथे पूल बांधला नाही ) हा मागास व हास्यास्पद आहे. त्यामुळे समुद्राची कोंडी होऊन भरत्या मुंबईच्या पर्जन्यवाहिन्यांमधुन उलट शहरात शिरतात. पूर्ण वांद्रे - कुर्ला संकुल ( बी के सी ) मिठी नदीच्या मूळ प्रवाहासह, सागराच्या भरती व ओहोटी रेषांमधील क्षेत्राला गाडून उभे आहे. अशा स्थितीत सर्व नाले , नलिका स्वच्छ आहेत, गाळ प्लास्टिक इ. घनकचर्यापासुन मुक्त आहेत, अशी कल्पना केली तरी मुंबई बुडणार आहे. सर्व शहर जलमय झाल्यावर पंप काय कामाचे. साठलेले पाणी एका ठिकाणी उचलून, टाकणार कोठे ? बी के सी मधील इमारती न बांधलेला भरावाचा भाग तर तातडीने काढून टाकावा. जमिनीच्या किंमतीचा विचार करू नये.

'मेट्रो ३ भूयारी रेल्वे' हा बोगस प्रकल्प आहे. तो नियोजनात नव्हता. कोणत्याही वाहतुक अभ्यासाने त्याची शिफारस केली नाही. 'हा प्रकल्प ३० वर्षांपूर्वी व्हायला हवा होता', हे याबाबतचे न्यायालयाचे विधान चुकीचे आहे. एम एम आर डी ए ने नागरिकांना दिलेल्या पत्रात कारणे देऊन, मुंबईत भूयारी रेल्वे करू नये असे म्हटले आहे. त्यात मुंबई बुडण्याचे कारणही आहे. प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी म्हणतात की, हरित ऊर्जा वापरू. याबाबत नागरिकांनी किती वीज वापरली जाणार ? व ऊर्जेबाबत इतर माहिती विचारली. यावर, मेट्रो ३ हा प्रकल्प सुरू झाल्यावर ही माहिती देऊ असे मासलेवाईक, बेजबाबदार उत्तर एम एम आर सी एल कडून मिळाले. या प्रकल्पात ६७३ झाडे तोडली जातील असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. प्रत्यक्षात सुमारे १५००० पेक्षा जास्त झाडे आतापर्य॔त तोडली गेली. माहीमच्या खाडीतील मॅनग्रोव्ह जंगल तोडले गेले. सन २०११ मधे या प्रकल्पाचा खर्च २४ ३४० कोटी रू. दाखवला आहे. तो आता वाढत ५०००० कोटी रूपयांवर गेला असा अंदाज आहे. तो अजून वाढेल. प्रकल्पामुळे मुंबईकरांचे आताच हाल होत आहेत. ९० ते १२० फूट खोल असल्याने भविष्यात तो मुंबईकरांना बुडवून मारणार आहे असे दिसते. एलफिन्स्टन पुलावर दिवसाढवळ्या घडणारी दुर्घटना हाताळता येत नाही तर १०० फूट खाली माणसांना कसे वाचवणार ?

फक्त २००० कोटी रूपयात बेस्ट बसचा ताफा दुप्पट, तिप्पट करून व कर्मचार्यांचे इतर प्रश्न सोडवून मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. गेल्या ३० वर्षांतील सर्व अहवालांनीदेखील बसला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. पण त्याविरूध्द जाऊन अनावश्यक बांधकामयुक्त महागड्या प्रकल्पांचा मारा करण्यात आला. याला बहुतेक मुंबईकरांची, स्वतःला आधुनिक मानून, पटकन खुळावली जाणारी तंत्रज्ञान संमोहित मानसिकतादेखील कारण आहे. प्रकल्पकर्ते तिचा खुबीने वापर करतात. मुंबईत ठिकठिकाणी जमीन खचत आहे हे दिसत असताना मेट्रो ३ प्रकल्प होऊ दिला तर नंतर अश्रू गाळून उपयोग नाही.

प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याची व तो रद्द करण्याची गरज आहे.

बर्याच नागरिकांना युरोप, अमेरिकेचे वेड आहे. तेथील जीवनशैली येथे यावी म्हणून ते आसुसलेले आहेत. त्यावर बोट ठेवून, आपण काहीही खपवू शकतो अशी संबंधित राजकारणी, नोकरशहा, कंपन्या, अभियंते इ. ना खात्री आहे. ते कोणतीही घातक गोष्ट करताना, आपल्याला विकास नको का ? आपण मागास राहणार का? असा प्रश्न विचारतात. त्यावर नागरिक मागे हटतात व आपण प्रगतीचे विरोधक ठरू नये या भावनेने पूर्ण चुकीच्या प्रकल्पाला विकास मानून, होकार देऊन बसतात.

नागरिकांनी याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

कृपया याला नकारात्मक विचार समजू नये. हा ज्ञानावर आधारित वास्तवाचे भान ठेवणारा, जीवनाची व ते देणाऱ्या पृथ्वीची जपणुक करणारा पूर्ण होकारात्मक विचार आहे. आम्ही सर्व जे काम करतो ते नकारात्मक, निराशावादी विचाराचा माणुस करू शकत नाही, हे नम्रपणे सांगू इच्छितो.

तापमानवाढीचे सतत भान हवे. दर वर्षी १/५° से म्हणजे पाच वर्षात १°से अशी इतिहासात कोट्यावधी वर्षांत न झालेली अभूतपूर्व वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत आहे. फक्त येत्या ४ वर्षांत सन १७५० च्या तुलनेत २°से ची वाढ होत आहे. माध्यमे सांगतात त्याप्रमाणे सन २१०० मधे नाही. मानवजात वाचविण्यासाठी केलेला 'पॅरिस करार' अयशस्वी ठरत आहे. भविष्यातील वादळांची व अतिवृष्टीची तीव्रता उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. कॅनडात आत्ता उष्णतेची अभूतपूर्व लाट चालू आहे. आतापर्यंत ५० च्या वर माणसे मरण पावली. जपानमधे तासाला चार इंच असा ऐतिहासिक विक्रमी पाऊस पडत आहे. महापूर आला आहे. ३० लाख नागरीकांना सुरक्षित जागी हलवले जात आहे व ५० ००० माणसे सुटका करण्याच्या कामाला लावण्यात आली आहेत. या घटनांची जाणीव हवी. त्याऐवजी राजकारण, मनोरंजन, युध्द, उद्योग, तंत्रज्ञान, अर्थव्यवहार अशा बिनमहत्वाच्या हानिकारक गोष्टीत जग गुंतले आहे.

विकासाच्या संमोहनातुन तात्काळ बाहेर पडणे आवश्यक आहे. मुंबईसह जगातील औद्योगिकरण थांबवण्याची प्रक्रिया तातडीने सुरू होणे व शहरीकरण विसर्जित होणे हे मानवजात व उरलेली जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तरच कार्बनचे उत्सर्जन व हरितद्रव्याचा नाश थांबेल. तसे केले नाही तर औद्योगिकरण कोसळण्याच्या प्रक्रियेबरोबर जीवनही नष्ट होईल. आशियातील औद्योगिकरणाचे प्रतीक असलेल्या मुंबईतील दुर्घटना मोठ्या अनर्थाची नांदी आहेत.

Updated : 5 Oct 2019 10:07 PM IST
Next Story
Share it
Top