Home > News Update > 'नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं' ; गिरीश महाजन यांची टीका

'नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं' ; गिरीश महाजन यांची टीका

नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं ; गिरीश महाजन यांची टीका
X

जळगाव// राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरीसह बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर समीर वानखेडेंकडे 70 हजार शर्ट, 2 लाखांचे बूट आणि 15 कोटींची संपत्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. मलिकांच्या या आरोपावरुन आता भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नवाब मलिकांवर खोचक टीका केली आहे. नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं, असं महाजन यांनी म्हटले आहे.

नवाब मलिक हे मनात येईल ते बोलत आहेत. आज बुट, सॉक्स, पँट पर्यंत येवून गेले. उद्या त्यांनी खालचे कपडेही काढले नाही तर बरं, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. आई, बाप, बहीण काढून अतिशय खालच्या थराचं राजकारण मलिक करत आहेत असही महाजन म्हणाले. त्याचवेळी मलिकांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असा सल्ला देखील महाजन यांनी दिला.

नवाब मलिक यांनी 2 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच लावली होती. वानखेडेंकडे महागडे बूट आहेत. लुई वेटॉनच्या बुटांची किंमत 2-2 लाख रुपये आहे. ते नेहमी बूट बदलत असतात. त्यांचं शर्टही 50 हजारापेक्षा अधिक किंमतीचं आहे. टी शर्टची किंमत 30 हजारापासून सुरू होते. ते जी ट्राऊजर परिधान करतात त्याची किंमत लाखो आहे. तर शर्टची किंमत 70 हजार रुपये आहे. त्याशिवाय ते 25 ते 30 लाखाचं घड्याळ वापरतात, असा दावा मलिक यांनी केला होता. हे तर मोदींच्याही पुढे निघाले.एवढे महागडे कपडे घालणारा अधिकारी कसला आला प्रामाणिक? असं मलिक म्हणाले होते.

दरम्यान मलिकांच्या प्रश्नावर समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिकांनी पुरव्यांशिवाय बेताल आणि खोटी वक्तव्य करू नयेत. समीर वानखेडेच्या हातात असलेले घड्याळ त्यांना त्यांच्या आईने सतरा वर्षांपूर्वी गिफ्ट केले होते. तेच घड्याळ ते आजही वापरत असल्याचे यास्मिन यांनी म्हटले. समीर वर्षातून एकदाच शॉपिंग करतात असंही यास्मिन वानखेडे म्हणाल्या.

Updated : 5 Nov 2021 1:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top