Home > News Update > छत्रपती संभाजी राजांच्या बदनामीप्रकरणी गिरीश कुबेर देशाची माफी मागा: अतुल भातखळकर

छत्रपती संभाजी राजांच्या बदनामीप्रकरणी गिरीश कुबेर देशाची माफी मागा: अतुल भातखळकर

छत्रपती संभाजी राजांच्या बदनामीप्रकरणी गिरीश कुबेर देशाची माफी मागा: अतुल भातखळकर
X

रेनिसन्स स्टेट या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत लिहिलेल्या तपशीलाबाबत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी देशाची माफी मागावी, तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी. अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी भाजपाच्या वतीने केली आहे.

काय म्हटलंय भातखळकर यांनी?

स्वधर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहीती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर संतापजनक आहे.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली, असे बिनबुडाचे दावे कुबेरांनी केले असल्याचं मत भातखळकर यांनी व्यक्त केलं आहे.

संभाजी महाराजांनी सोयराबाई राणीसाहेबांना ठार मारल्याचा कोणताही समकालीन पुरावा उपलब्ध नाही. अष्टप्रधान मंडळातील सदस्य असलेले संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी जात असताना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहीते यांनी त्यांना अटक केली. परंतु पुढे त्यांना मुक्त करण्यात आले आणि मुजुमदार हे पद देण्यात आले. मे, १६८१ नंतर आण्णाजी दत्तोंनी पुन्हा दुसऱ्यांदा बंडखोर अकबराच्या सहाय्याने संभाजी महाराजांना कैद करण्याचे नियोजन केले. ही गोष्ट संभाजी महाराजांना कळताच त्यांनी कठोर पाऊल उचलत आण्णाजी दत्तोंना मृत्यूदंडाची शिक्षा दिली.

शिवाजी महाराजांच्या सैन्याने सामान्य प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत. मात्र, संभाजी महाराजांच्या सैन्याने केले. संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता नव्हती आणि परराष्ट्रविषयक धोरणही नव्हते, असे अनेक खोडसाळ दावे करताना कुबेरांनी इतिहासातील अनेक महत्त्वाचे तपशील नजरेआड केले आहेत. असे गिरीश कुबेर यांचे म्हणणे अत्यंत संतापजनक असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

गिरीश कुबेर लिखित खोडसाळपणाचे गाठोडे असलेल्या या पुस्तकाने महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाला अपमानित करण्याचे काम केले आहे. ठाकरे सरकारने जनभावनांची तात्काळ दखल घेऊन या पुस्तकावर बंदी घालावी. पुस्तकाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या प्रती तात्काळ मागे घ्याव्यात. कुबेरांनी याप्रकरणी माफी न मागितल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आग्रही मागणी सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

Updated : 24 May 2021 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top