Home > News Update > संतापजनक: अल्पवयीन मुलीवर 9 महिने 33 जणांकडून अत्याचार

संतापजनक: अल्पवयीन मुलीवर 9 महिने 33 जणांकडून अत्याचार

संतापजनक: अल्पवयीन मुलीवर 9 महिने 33 जणांकडून अत्याचार
X

डोंबिवली : मुंबई, पुण्यातील बलात्काराच्या समाजमन सुन्न करणाऱ्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी डोंबिवलीतील 15 वर्षांच्या मुलीवर तब्बल 33 नराधमांनी नऊ महिन्याच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान पीडित मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत 23 आरोपींना अटक केली आहे. यात दोघे आरोपी अल्पवयीन असून उर्वरित आरोपी 20 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहेत.

पीडित मुलगी ही डोंबिवली ग्रामीण भागात राहते. जानेवारीत तिला तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला. दरम्यान त्यावेळी त्याने शरीरसंबंधांचा व्हिडीओ काढला आणि हा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर व त्याच्या मित्रांनी तिच्यावर तब्बल 9 महिने बलात्कार केला.

29 जानेवारी ते 22 सप्टेंबर या काळात पीडितेवर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पीडितेने पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पीडितेच्या तक्रारीवरून आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी चार विशेष पथके स्थापन करत 10 फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान घटनेचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन घटनेचा तपास स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडे न देता ठाणे विभागाच्या महिला सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीची कळवा येथील एका रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.या घटनेनं अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून त्या नराधमांना कठोरतील कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

Updated : 24 Sep 2021 3:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top