Home > News Update > कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पुन्हा अटक

कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पुन्हा अटक

कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना पुन्हा अटक
X

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख व कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मुरूड तालुक्यात कोर्लई हद्दीत बनावट खरेदी दस्ताऐवज बनवुन शासकीय जमिनीची खरेदी-विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कोर्लई येथील दोघांवर व उल्हासनगर येथील एकीवर असा तिघांवर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्हाच्या तपासात शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख व कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

बोर्ली मंडल अधिकारी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत, कोर्लई येथील प्रितेश रोटकर व विनय महालकर यांनी सरकारी पड ही शासकीय जमिन असतानाही त्या मिळकत क्रमांक 33 च्या असल्याचे भासवून बनावट खरेदीखतात नमूद केले. तसेच संजिवनी भगत (रा.उल्हासनगर) यांना माहित असताना बनावट खरेदी दस्ताऐवज बनवून शासकीय जमिनीची खरेदी विक्री करून शासनाची फसवणूक केली असे म्हटले होते.

त्यानुसार रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या गुन्हाचा तपास अलिबाग पोलिस उपविभागीय अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आला. या गुन्हाच्या तपासात प्रशांत मिसाळ यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हातील उल्हासनगर येथील संजिवनी भगत यांना अटकपुर्व जामिन मिळविण्यात यश आले आहे. यापुढील तपास अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी अरूण भोर करीत आहेत.

Updated : 9 Sep 2023 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top