Home > News Update > नागपुरातील हे पहिले समलैंगिक लग्न

नागपुरातील हे पहिले समलैंगिक लग्न

नागपुरातील हे पहिले समलैंगिक लग्न
X

दोन उच्चशिक्षित तरुणींनी एक असा धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. या दोन तरुणींचे एकमेकांवर खूपच जीवापाड प्रेम असल्याने त्यांनी उर्वरित पुढील आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालवण्याचे ठरवले आहे.

डॉ सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी यांनी रीतसर (रिंग कमिटमेंट सेरेमनी)अर्थात एका प्रकारे साक्षगंधाचा विधी देखील उरकला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या दोघी विवाह बंधनात देखील अडकतील. समाजासाठी आणि या दोघींसाठी जरी हे लग्न असले तरी कायदेशीर भाषेत या नात्याला सिविल युनियन असे संबोधले जाणार आहे.

डॉ सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी असे या दोन्ही तरुणींचे नाव आहे. यापैकी एक डॉ सुरभी ही नागपुरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे तर पारोमिता मुखर्जी या कार्पोरेट क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करते. समलैंगिक लग्नाला सध्यातरी आपल्या समाजाने खुल्या मनाने स्वीकारले नसले तरी या दोन्ही तरुणींच्या कुटुंबियांनी त्यांच्या निर्णयाचा मान राखत लग्नाला परवानगी दिली आहे.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातील हे पहिले समलैंगिक लग्न आहे, त्यामुळे या लग्नाची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये लागली आहे. एरवी या विषयावर उघडपणे बोलणे टाळणाऱ्यांने समाज माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. डॉ सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या दोघी या निर्णया पर्यत कश्या पोहचल्या हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. समलैंगिक लग्नाला आपल्या समाजाने स्वीकारले नसल्यामुळे त्यांच्यासाठी हा निर्णय घेणे नक्कीच सोपे नव्हते.

अश्या जुळल्या रेशीमगाठी

गेल्यावर्षी डॉक्टर सुरभी मित्रा या एका सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी कलकत्ता येथे गेल्या होत्या. त्यावेळी पारोमिता मुखर्जी या देखील त्या सेमिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या. सेमिनार मध्ये डॉ सुरभी यांचे मनोगत ऐकून पारोमिता फारच प्रभावित झाल्या. खऱ्या अर्थाने या दोघींच्या लव स्टोरीला येथूनच सुरुवात झाली. पहिल्या भेटीतच दोघींमध्ये मैत्री झाली, पुढे मैत्री आणखी घट्ट होत गेली असता त्या एकमेकींच्या आवडी-निवडी जपायला लागल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात फोन आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून होणारे संभाषण वाढतच गेले. दररोज एकमेकीं व्हिडिओ कॉल केल्याशिवाय त्यांचा दिवसच मावळत नसे. त्यानंतर मात्र दोघींना प्रत्यक्षात भेटीची ओढ लागली होती. ठरल्याप्रमाणे भेट सुद्धा झाली, त्यावेळी त्यांनी एकमेकींसमोर समलैंगिक लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

रिंग सेरेमनीनंतर आता सुरभी आणि पारोमिता गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. रिंग सेरेमनीप्रमाणेच दोघांनीही त्यांच्या लग्नाला सिव्हिल युनियन असे नाव दिले आहे. दोघीही त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत आणि लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत.

कायदेशीर मार्गाने संमती मिळवणार

आपल्या समाजात समलैंगिक लग्नाला मान्यता नाही, त्यामुळे कायदेशीर मार्गाने आपले होणारे लग्न वैध ठरवण्यासाठी डॉ सुरभी आणि पारोमिता कायदेशीर मार्गाने पुढे जाणार आहेत. याशिवाय ज्या ठिकाणी समलैंगिक लग्नाला समाज सहजरीत्या स्वीकार करेल अश्याच ठिकाणी त्या स्थायिक होण्याच्या विचारता आहेत.

Updated : 7 Jan 2022 4:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top