Home > News Update > माज्या जल्माची चित्तरकथा संपली ;शांताबाई कृष्णाजी कांबळेंचे निधन

माज्या जल्माची चित्तरकथा संपली ;शांताबाई कृष्णाजी कांबळेंचे निधन

माज्या जल्माची चित्तरकथा संपली ;शांताबाई कृष्णाजी कांबळेंचे निधन
X

मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका दलित पँथरचे नेते दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या मातोश्री शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले, त्या शंभर वर्षांच्या होत्या.

माज्या जल्माची चित्तरकथा हे त्याचं आत्मवृत्त विशेष गाजलं. पहिल्यांदा मार्च १९८३ साली ते पूर्वा मासिकात आलं, त्या आधी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी या पुस्तकाला १९८२ आली अनुदान दिल आणि ते पूर्वा प्रकाशना तर्फे १७ जून १९८६ रोजी पुस्तक रूपात आलं.

पूर्वाश्रमीच्या नाजुका (नाजाबाई) सखाराम बाबर यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी सांगली जिल्ह्यातील (तालुका आटपाडी, मु. पो. करगणी) महूद या गावी झाला. या ठिकाणीच प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर पुणे येथे प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षणाची २ वर्षे पूर्ण करून १९५२मध्ये त्या उत्तीर्ण झाल्या. प्राथमिक शिक्षिका म्हणून कुर्डूवाडी, आटपाडी, दिघंची, करगणी येथे अध्यापन केले. पुढे मुख्याध्यापिका, शिक्षणाधिकारी या पदापर्यंत प्रवास झाला.

१९५२ साली पुण्याच्या विमेन्स कॉलेजमधून ट्रेनिंग कॉलेज वर्ष दुसरे वर्ष त्या उत्तीर्ण झाल्या. काही काळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. २८ फेब्रुवारी १९८१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचे पहिलेच आत्मकथन त्यांनी लिहिले.

दलित स्त्रीचे मराठी साहित्यातील पहिले आत्मकथन 'माज्या जल्माची चित्तरकथा' त्यांनी लिहिले. या आत्मकथनाची भाषांतरे इंग्रजी, फ्रेंच, कानडी, हिंदी या भाषांमध्ये झाली. दुसर्‍या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या हस्ते शनिवार वाड्यात संपन्न झाला. या आत्मकथनावर आधारित 'नाजुका' नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सादर करण्यात झाली.

सुरुवातीच्या काळातल्या हाल-अपेष्टा, जातीनुसार आलेल्या कामांचे, देव-देवरुषी यांच्यावरील अंधश्रद्धेमुळे झालेल्या नुकसानीचे वेदनादायक चित्रण त्यांच्या आत्मकथनात येते.त्यांच्या मागे मुले, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचे पती कृष्णाजी नारायण कांबळे (गुरुजी).

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे , तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ७ वाजता कोप कोपरखैराणे येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे अंत्यविधीस रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले व चळवळीतील नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

माज्या जल्माची चित्तरकथा आत्मवृत्तात काय आहे?

१९३० ते १९५० ह्या सुमाराचे ग्रामीण जग कसे होते, त्याचे ठसठशीत दर्शन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य होय. समाजाचा गाडा कसा चालतो, देव-देवरुषी यांचा पगडा, तुलनेने स्वस्ताई असूनही अन्नाच्या दाण्या-दाण्याला पारखा झालेला गोर-गरीब, ढोरफाडीचे नियम, त्यातली हिस्सेदारी, पोलिसांची अरेरावी, जातीच्या-गावाच्या न्यायपद्धती, देवळात प्रवेश नसूनही विठ्ठलाची ओढ, त्याच्या वारीला यथाशक्य जाणे, मुसलमानांच्या पिराला नवस बोलणे, गरिबांच्या घरांच्या रचना, त्यातले सामान, पावसाळ्यात त्यांच्या वाढणार्‍या हालअपेष्टा, जातीयतेचे दृश्य स्वरूप, विद्यार्थी गळतीचे कारण, रोगराई, पिराला मलिदा देणे अशा सर्व तर्‍हांच्या विषयांना प्रसंगानुरूप स्पर्श करून त्या काळाचे कोरीव चित्र शांताबाईंनी साकार केले आहे, तेही अल्पाक्षरी शैलीत, संयमाने.

शिक्षणाचे महत्त्व पटल्यामुळे हृदय कमजोर असूनही त्या नोकरीचा राजीनामा देत नाहीत आणि आपल्या तिन्ही मुलांना उत्तम शिक्षण देतात. मुलेही कष्टाचे चीज करतात. मोठा मुलगा धाकट्यांच्या शिक्षणाला मदत करतो. पतीचे चित्रणही 'चरित्र' म्हणून न येता ओघाओघात जसे आले तसे केले आहे. पतीच्या सुरुवातीच्या वागणुकीबद्दल अतिशय तटस्थपणे बाई बोलतात. पण पुढे त्यांचा सहभाग, त्यांचे कलावंतपण तितक्याच सहजपणे सांगतात.

Updated : 25 Jan 2023 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top