अमेरिकेने आडमुठी भूमिका सोडली, भारताच्या लसीकरणाला वेग येणार
X
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्था ढासळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लसींचे उत्पादन वाढवावे लागणार आहे. पण हे उत्पादन वाढवण्यासाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने नकार दिला होता. पण आता अमेरिकेने कच्चा माल देण्याची तयारी दाखवल्याचे वृत्त एनआयएने दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकेने आपली आडमुठी भूमिका सोडल्याने भारतातील लसी निर्मितीला आता वेग येणार आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लसीचे उत्पादन होते. एस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड यांच्या मदतीने हे उत्पादन केले जाते. पण या लसींच्या निर्मितीकरीता लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिकेने कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याचे त्यांनी म्हटले होते. गेल्यावर्षी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने भारताने तातडीने हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्यांचा पुरवठा केला होता.