Home > News Update > #Farmer Protest: १८ ऐवजी २४ महिने कायदे स्थगितीचा तोडगा?

#Farmer Protest: १८ ऐवजी २४ महिने कायदे स्थगितीचा तोडगा?

गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. यावर कोणताही तोडगा निघालेला नसताना आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी एक तोडगा सुचवलेला आहे.

#Farmer Protest: १८ ऐवजी २४ महिने कायदे स्थगितीचा तोडगा?
X

नवीन कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अजून कोणताही तोडगा निघालेला नाही, पण आता केंद्र सरकारने दिलेल्या अठरा महिने स्थगितीच्या प्रस्तावाऐवजी नवीन कायद्यांना 24 महिन्यांची स्थगिती म्हणजेच दोन वर्षांची स्थगिती दिली तर तोडगा निघू शकतो, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिलेली आहे. 'द इंडीयन एक्सप्रेस' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमरिंदर सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे. या प्रस्तावा संदर्भात शेतकऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत, काही शेतकरी संघटना या दोन वर्षांच्या स्थगितीला तयार आहेत तर काही संघटनांचा तीन वर्षांच्या स्थगितीचा आग्रही आहेत, पण शेतकऱ्यांना आता पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या गव्हाच्या हंगामासाठी शेतांमध्ये परतायचं असल्याने यावर तोडगा निघाला पाहिजे, अशी मागणी अमरिंदर सिंग यांनी केलेली आहे.

तर दुसरीकडे पंजाबमध्ये पाकिस्तानातून शस्त्रास्त्र तस्करीचे प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून वाढलेले आहेत. पंजाबच्या अस्वस्थ तरुणांना चुकीच्या मार्गाला नेऊन पंजाबला पुन्हा अस्वस्थ करण्याचा पाकिस्तानचा कट केंद्राने उधळून लावावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांना पुढच्या महिन्यात निघणाऱ्या गव्हाच्या पिकासाठी परत यायचे आहे, त्यामुळे सरकारने आता हट्टीपणा सोडून यावर तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी केले आहे. ग्रेटा थनबर्ग विरोधात कारवाई किंवा दिशा रवी आणि इतरांना अटक करून सरकारला काय साध्य होणार आहे, असा सवाल देखील अमरिंदरसिंग यांनी विचारला आहे.

एकूणच आता शेतकऱ्यांनी कायदे स्थगितीचा तोडगा स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे संकेत अमरिंदरसिंग यांनी दिलेले आहेत. आता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या या सादेला कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 21 Feb 2021 6:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top