Home > News Update > रायगड येथे पाच दिवसाच्या गौरी गणपतीला साश्रुनयनांनी निरोप

रायगड येथे पाच दिवसाच्या गौरी गणपतीला साश्रुनयनांनी निरोप

रायगड येथे पाच दिवसाच्या गौरी गणपतीला साश्रुनयनांनी  निरोप
X

रायगड// गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोष करत पाच दिवसाच्या गणरायाला संपुर्ण पाली - सुधागडसह जिल्ह्यात भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत व शासन नियमांचे पालन करीत घरगुती व सार्वजनिक गणरायाचे विसर्जन मोठ्या मंगलमय व भक्तीपुर्ण वातावरणात करण्यात आले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यंदा ढोल, ताशा, वाद्यवृंद व मिरवणूक काढता आल्या नाहीत. यावर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून विसर्जन स्थळी होणारी पूजा घरीच करण्यात आली.

अनेकांनी श्रीची मूर्ती , शाडू व पर्यावरणपूरक घेणे पसंत केले व अशा मूर्तींचे विसर्जन ही घरीच करणे पसंत केले. सामाजिक , विधायक उपक्रमाबरोबर अनेकांनी पर्यावरण पूरक व प्रबोधनात्मक दृष्ट्या गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले. जिल्ह्यात काही ठिकाणी कृत्रिम तलावांची देखील निर्मिती करण्यात आली होती. तसेच ठिक- ठिकाणी नद्या , तलाव व समुद्रात गणेश विसर्जन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर सर्वत्रच पाच दिवसाच्या गौरी गणपतीला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत राहून उत्साही वातावरणात गणेशभक्तांनी सण साजरा करण्यास प्राधान्य दिले. दरम्यान गणेशोत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी घेत पाली पोलिसांचा सर्वत्र कडेकोट बंदोबस्त होता.

सुधागड तालुक्यातील अनेक गणेशमुर्तींचे विसर्जन गावाच्या जवळील नदी व तलावात करण्यात आले. यावेळी विसर्जनस्थळी लहानथोरांनी भक्तिभावाने सहभाग दर्शविला होता. पाली हे अष्टविनायक बल्लाळेश्वराचे धार्मिक स्थळ. त्यामुळे दरवर्षी पालीतील गणेशोत्सव व त्यानिमित्त राबविलेले कार्यक्रम , प्रबोधन , जनजागृती विशेष मानले जातात. तमाम कोकणवासीयांचा सर्वात लाडका व मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्‍या गणरायाचे जोरदार आगमन झाले होते. घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने दहा दिवस प्रसन्न वातावरणाने भारावलेले असतात.

अशातच घरी बाप्पा आलेत या दर्शन घ्यायला असे उद्गार तर सतत कानावर पडतात. गणेशोत्सवात लहान- थोरांसह आबालवृध्द व महिला पुरुष तरुण- तरुणी यांचा उत्साह दांडगा असतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावे वाड्या,वस्त्या मुंबई, पुणेसह बड्या शहरातील नातेवाईकांनी अगदी गजबजून जातात. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये याकरिता शासनाने नियम व अटी दिल्या होत्या. अशातही शासन नियमांचे पालन करून साजरा झालेल्या सणात उत्साह व आनंद ओसंडून वाहताना पहायला मिळाला. सर्वत्र आनंद, उत्साह व नवचैतन्याने भारावलेले प्रसन्न व मंगलमय असे वातावरण निर्माण झालेले पहावयांस मिळाले.

गणेशोत्सवादरम्यान अनेक प्रथा व परंपरांचे जतन करुन उत्सव साजरा करण्यावर भर दिल्याचे दिसून आले. पालीसह जांभुळपाडा, परळी व शेकडो गावे वाड्यावस्त्यात, आदवासीवाड्यापाड्यात सर्वत्र गणरायाचाच गजर ऐकू येत होता. पुजापाठ, आरती, भजन, किर्तन, संगित आदिंसह विविध प्रबोधनात्मक व समाजपयोगी उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यावर गणेशोत्सव मंडळासह गणेशभक्तांनी भर देत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अष्टविनायक देवस्थानापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्वर मंदीरात देखील नियम काटेकोरपणे पालन करीत गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

पाली खोपोली राज्यमहामार्गासह पालीत सतत होणार्‍या वहातूक कोंडीच्या अनुषंगाने वहातुक पोलीस तैनात करण्यात आले होते. दरम्यान पोलिसांना नागरीकांचे देखील मोठे सहकार्य लाभले. सुधागड तालुक्यात सर्वत्र समाजप्रबोधन व जनजागृतीसह पर्यावरणपुरक असा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान शांतता व सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे व पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस निरिक्षक विजय तायडे यांनी चोख व कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याबरोबरच पाली सुधागडात पोलीस व्हॅन सतत गस्त घालत होती.

विसर्जनस्थळी स्वच्छता व विजव्यवस्थेबरोबरच अन्य सेवासुविधा प्रशानामार्फत पुरविण्यात आल्या होत्या. पाली सुधागड तहसिलदार दिलीप रायन्नावार यांनी गणेशोत्सवादरम्यान शासन प्रशासनाला आवश्यक त्या सुचना देत उपाययोजना सुचविल्या होत्या. विसर्जनस्थळी जीवरक्षकांसह पोलीस तैनात करण्यात आल्याने गणेशभक्तांना मनोभावे पुजन करुन बाप्पाचे विसर्जन करता आले. कोरोनाच्या काळात एकूणच शासन प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमिवर केलले निटनेटके नियोजन तसेच नियमांचे पालन करीत शांतता, सलोखा व एकोपा राखत उत्सव साजरा करण्यासाठी नागरीकांनी स्वयंस्फुर्तीने घेतलेला पुढाकार वाखाणण्याजोगा व प्रेरणादायी होता.

Updated : 14 Sep 2021 1:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top