Home > Fact Check > Fact Check | पोलिसांवर थुंकणाऱ्या 'त्या' मुस्लीम युवकाचं सत्य

Fact Check | पोलिसांवर थुंकणाऱ्या 'त्या' मुस्लीम युवकाचं सत्य

Fact Check | पोलिसांवर थुंकणाऱ्या त्या मुस्लीम युवकाचं सत्य
X

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमधील घटनेनंतर देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचं दिसून येत आहे. त्याला आता धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक व्हिडीओ वेगवेगळ्या मेसेजसह सध्या व्हायरल आहेत. ज्यात मुस्लीम जाणीवपूर्वक देशात कोरोना पसरवत असल्याचा दावा करण्यात येतोय.

असाच एक व्हिडिओ व्हायरल आहे. ज्यात एक मुस्लीम युवकाला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात आहेत. यावेळी तो युवक पोलिसांना शिवीगाळ करतो आणि पोलिसांचा अंगावर थुंकतो. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून तो जाणूनबुजून पोलिसांवर थुंकत असल्याचा दावा अनेक मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडीओ :

तथ्य पडताळणी :

या व्हिडीओत दिसणारे पोलीस हे महाराष्ट्रातील आहेत. त्यावरून या मूळ व्हिडीओचा शोध घेतला असता एक महिन्यापूर्वीची एक घटना सापडली.

मुंबई मिररच्या फेसबुक पेजवर २९ फेब्रुवारी रोजी हा व्हिडीओ पोस्ट केलेला दिसतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ ३ मार्च रोजी वापरण्यात आला आहे.

यासोबतच TrueScoop न्यूज आणि नवभारत टाईम्स यांनीही हा व्हिडीओ २९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान वापरला आहे.

गुगल सर्चमध्ये हा व्हिडीओ सर्वात आधी मुंबई मिररने २९ फेब्रुवारी रोजी वापरला असल्याचं दिसतंय. याचाच अर्थ ही घटना फेब्रुवारी महिन्यातली आहे.

आणखी शोध घेतला असता संपूर्ण घटना समोर आली. ठाणे तुरुंगात असतांना घरचे जेवण न दिल्याचा राग मनात ठेवून मोहम्मद सोहेल शौकत अली या कैद्याने पोलीस व्हॅनमध्येच पोलिसांना शिवीगाळ केली. यावेळी त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर थुंकत धक्काबुक्की केली आणि चावा घेतला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दै. तरुण भारतने २९ फेब्रुवारी रोजी याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केलं आहे.

दै. दिव्य मराठीनेही १ मार्चला याबाबत वृत्त दिलं आहे.

निष्कर्ष -

कोरोनाबाधित मुस्लिम तरुण पोलिसांवर थुंकत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडलेली आहे. त्याचा कोरोना किंवा मरकजशी कसलाही संबंध नाही. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे.

Updated : 4 April 2020 1:05 AM GMT
Next Story
Share it
Top