रेड झोनमधील विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक: अनिल देशमुख

Courtesy: Social Media

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही विमानसेवा बंद ठेवल्या होत्या. पण आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण महाराष्ट्रात विमानसेवेबाबत राज्य सरकारने याआधी जारी केलेले आदेशच लागू राहणार असल्याने राज्यात सध्या तरी विमानसेवा सुरू होऊ शकणार नाही असं चित्र आहे. त्यातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेड झोनमधील विमानतळं सुरु करणं अत्यंत धोकादायक असल्याचं ट्विट करत याचा विरोध केला आहे.

‘रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे.’


ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोका ही वाढेलच, अशा आशयाचं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं आहे.

दरम्यान राज्य सरकारने 19 मे रोजी काढलेल्या आदेशात विमानसेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 47 हजारांच्यावर गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर झोनच्या रचनेत बदल करण्या व्यतिरिक्त लॉकडाऊनचे सर्व निर्बंध कायम ठेवण्याचे जाहीर केले आहे.