Home > News Update > शेतमालाला मिळतोय मातीमोल भाव....

शेतमालाला मिळतोय मातीमोल भाव....

कोरोनाचे संकट अतिवृष्टी अनेक भागात पावसाने दिलेला ताण आणि वाढता उत्पादनखर्च अशा गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याला आता पडलेल्या बाजारभावानं बेजार केलं आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं शेतमालाचे दर पडल्यामुळं शेतकऱ्यांना शेतमाल फेकून देण्याची वेळ आली आहे.

शेतमालाला मिळतोय मातीमोल भाव....
X

नाशिकसह राज्यातील सर्वच भागात फळं आणि भाजीपाला शेतकऱ्यांची हिच स्थिती आहे. इतक्या कमी दरामुळे शेतीसाठी एकरी केलेला उत्पादन खर्च भरून निघणंही कठीण झालं आहे. बाजारात आणलेला माल परत घेऊन जाणं देखील परवडत नसल्यानं मिळेल त्या मातीमोल दरांमध्ये शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतमाल रस्त्यावर फेकून देणं पसंद केलं. तर काही शेतकऱ्यांना शेतमाल जनावरांना खाऊ घातला आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांची मानसिक आणि आर्थिक कोंडी झाली आहे.




आवक वाढल्यानं शेतमालाचे भाव मार्केटमध्ये उतरल्याचं नाशिक परिसरातील शेतकरी सचिन कडलग यांनी सांगितले. शेतकरी शेतातून चार पैशांचा फायदा होईल या आशेवर पिकांवर वेळोवेळी औषधाची फवारणी करुन अमाप खर्च करत आहे. परंतु मातीमोलबाजारभावामुळे खर्च करावा कि नाही असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. परंतु आज ना उद्या भाव मिळेल ह्या भाबड्या आशेवर राहून उधारीने का होईना खर्च करत आहे, असे ते म्हणाले.

कांदा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो पिकांचीदेखील अशीच अवस्था झाली आहे. करल्याला देखील एक रूपये प्रति किलोदराने भाव मिळत आहे. खर्चही निघत नसल्याने शेतकरी उभ्या पिकांत नांगर धरत आहेत. उभ्या पिकांवर टॅक्‍टरचे रोटर फिरविणेही अवघड झाले आहे. त्यामुळे उधारी कशी फेडायची याची चिंता आहे. बाजारातून घरी मात्र दमडीही शिल्लक येत नाही, असे शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले. खते, बियाणेचे दर वारेमाप वाढत असताना शेतमालाचे दर पडत असल्याचे दुर्देवी चित्र आपल्याकडे असल्याचे शिंदे म्हणाले.




शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरून वेगवेगळी पिके घेत आहेत.त्यामुळे पारंपरीक शेतीपेक्षा अधिक खर्च होत आहे, मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही पिकांमधून चांगले पैसे मिळत नाहीत. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील शेतकरी हैरैण झाला आहे. यामुळे पिके तरीघ्यायची कुठली? असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. कारण अत्यल्प बाजारभाव हीच मुख्य समस्या असून यात शासन हस्तक्षेपातून मार्ग काढणे आवश्यक असल्याचे भाजीपाला अभ्यासक राहूल पवार यांनी सांगितले.





Updated : 21 Aug 2021 6:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top