Home > News Update > अख्खा महाराष्ट्र बेवारस आणि मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी- यशोमती ठाकूर

अख्खा महाराष्ट्र बेवारस आणि मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी- यशोमती ठाकूर

अख्खा महाराष्ट्र बेवारस आणि मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी- यशोमती ठाकूर
X

अमरावती : राज्यातील जनतेचं सरकार मायबाप असते, मात्र या सरकारचा अजूनही ठावठिकाणा नाही त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र बेवारस झाला आहे, अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. सरकार स्थापन होऊन एक महिना झाला आहे, मात्र अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ कुणाला नेमायचं याचे धाडस झालेले नाही, कोणतं खातं कुणाकडे आहे हे माहिती नाही, या शब्दात यशोमती ठाकूर यांनी टीका केली आहे.

विविध कारणांसाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी सुरू आहे, कोण कुणाला ठकवतात ते जनतेला समजत नाही, पण महाराष्ट्राचे नुकसान झालेलं आम्हाला चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलेला आहे. संपूर्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात पालकमंत्री नाही, त्यामुळे पालकमंत्र्याविना जिल्हे पोरके झालेत. दोन मंत्र्यांचं राज्य सरकार शेतकऱ्यांसह राज्यातील जनतेकडे दुर्लक्ष करीत आहे, अशीही टीका ठाकूर यांनी केली आहे.

त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार माजला आहे. गावा-गावात पुराचे पाणी शिरून प्रचंड नुकसान झाले. शेती पाण्याखाली गेली आहे, घरांमध्ये पाणी शिरले, गुरेढोरं वाहून गेली आहेत. त्यामुळे या अतिवृष्टीचा तडाखा अमरावती जिल्ह्याला बसला असून शेतीसह घर, मालमत्ता आणि पशुधनाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचे दूरगामी परिमाण दिसून येत असून नुकसानी संदर्भातील पंचनामे तत्काळ करून अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे केली आहे.

Updated : 27 July 2022 2:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top