Home > News Update > आचारसंहिता धाब्यावर बसवत बुलडाण्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

आचारसंहिता धाब्यावर बसवत बुलडाण्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा

आचारसंहिता धाब्यावर बसवत बुलडाण्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा
X

बुलडाणा : जे कायदा तयार करतात तेच जेव्हा कायदे पायदळी तुडवतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अशा नेत्यांकडून नेमका काय आदर्श घ्यावा, असा प्रश्न बुलडाणा जिल्ह्यात चर्चिला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, मात्र आचारसंहितेचे नियम पायदळी तुडवत पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासह आमदारांनी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पाडला. या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असताना देखील आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे कायद्याचे नियम हे फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच का..? असा सवाल उपस्थित होत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, शेगाव तालुका व शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नंदा पाऊलझगडे यांनी शेगावमध्ये भव्य कृषी मार्गदर्शन व राष्ट्रवादी परिवार कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता, तर दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोटनिवडणूक होत आहेत. त्याचबरोबर मोताळा नगरपंचायतीच्या सदस्यांसाठी देखील निवडणुका पार पडत आहेत, त्याच बरोबर शुक्रवारी विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आणि हा सर्व निवडणूक कार्यक्रम ठरलेला असताना निवडणूक आयोगाने 22 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे प्रशासनाने राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला परवानगी तर दिलीच नव्हती उलट कार्यक्रम न घेण्यासंदर्भात आयोजकांना नोटीस बजावली होती, मात्र या नोटीस आणि आचारसंहितेचा आदेशाला केराची टोपली दाखवत हा कार्यक्रम घेण्यात आला.


आणि या कार्यक्रमाला तालुका स्तरावरील पदाधिकारी नव्हे तर चक्क राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते, तर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे देखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मध्ये होते. या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते, दरम्यान मेळाव्यातील बहुतांश लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते, आणि सोशल डिस्टंसिंगचा देखील फज्जा उडाल्याचे दिसून आले, त्यामुळे या कार्यक्रमात आदर्श आचारसंहितेचा भंग करणे आणि कोविड नियमांचे उल्लंघन करणे या दोन्ही बाबतीत कायद्याला पायदळी तुडवण्याचे काम झाले आहे.

यासंदर्भात निवडणुक अधिकाऱ्यांना संपर्क साधला तेव्हा भरारी पथकाच्या अहवालानंतर कारवाई करण्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Updated : 10 Dec 2021 11:45 AM GMT
Next Story
Share it
Top