Home > News Update > शिंदे-फडणवीस-पवारांनी विरोधकांसमोर उभं केलं आव्हान

शिंदे-फडणवीस-पवारांनी विरोधकांसमोर उभं केलं आव्हान

शिंदे-फडणवीस-पवारांनी विरोधकांसमोर उभं केलं आव्हान
X

मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे आयोजित चहापानाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षालाच कोंडीत पकडण्याची रणनीति आखलीय. शिंदे-फडणवीस-पवार या तिघांनीही विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिकांचा अनुभव सरकारकडे आहे, त्यामुळं खऱ्या अर्थानं आता विरोधकांसमोरच या तिघांना कसं सामोरं जायचं हे आव्हान असणार आहे.

सह्याद्री अतिथिगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांनी राज्यातील प्रश्नांना वाचा फोडायची असते. मात्र, विरोधकांनी पाठवलेलं पत्र हे अंतिम आठवडा प्रस्तावाच्या पत्रासारखं पाठवलंय. विरोधी पक्ष गोंधळलेला दिसतोय. विरोधी पक्षानं आत्मविश्वास गमावलेला आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. विरोधकांनी राज्यातील सर्वसामान्य़ जनतेच्या प्रश्नांना विधीमंडळाच्या सभागृहात वाचा फोडली पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी विविध आयुधं वापरला पाहिजेत, हे सर्व विरोधी पक्षांनी करणं अपेक्षित असतं. मात्र, दुर्दैवानं आज तसं होतांना दिसलं नाही, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. “अजित पवार लवकर पहाटे काम करतात, मी उशीरापर्यंत काम करतो. आणि देवेंद्र फडणवीस तर ऑल राऊंडर आहेत. बॉलिंगपण करतात, विकेटपण घेतात, बॅटिंगपण करतात. चौकार, षटकार मारतात, फिल्डिंगपण चांगली करतात”, अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रावर खुलासा केलाय. महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेवरून पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राला अनुसरून फडणवीसांनी खुलासा केलाय. ते म्हणाले, “ पंजाब, गुजरात, राजस्थान हे राज्य वगळले तर महाराष्ट्र हा शैक्षणिक गुणवत्तेत पुढेच आहे.

नव्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्ष कुठे आहे ते शोधावं लागेल. जे जे प्रश्न येतील, जे काही आयुधांच्या माध्यमातून विचारलं जाईल, त्याला योग्य पद्धतीनं न्याय देण्यात येईल, असं स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही तिघंही विरोधी पक्षनेते होतो. आमच्याकडे सर्व अनुभवी लोकं आहेत. आम्ही विरोधासाठी विरोध केला नाही.


Updated : 16 July 2023 3:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top