एकनाथ खडसे यांच्या हातात खरंच ‘फडणवीस हटाओ, महाराष्ट्र’ बचाओ पोस्टर होतं का?

12393

कोरोना नियंत्रणात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप ने ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन’ आज राज्यभर केलं. हे आंदोलन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पार पडलं. या आंदोलनात भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे भाग घेणार का? याची उत्सुकता राज्यभर होती.

फडणवीस आणि खडसे यांच्यातील वाद सर्वांनाच माहित आहे. विधानसभेनंतर विधानपरिषदेचही तिकीट नाकारल्याने खडसेंनी पक्षावरच जाहीर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेईल असं विधान केले होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेनंतर खडसे आणि पाटील या दोघा नेत्यांमध्येच चांगलाच वाद रंगला होता.

मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसेंनी सून खासदार रक्षा खडसे यांच्या बरोबर भाजपच्या ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनात सहभागी झाले.  हातात ‘उद्धवा अजब तुझं आघाडी सरकार’ अस पोस्टर हातात घेऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध ही केला.

हे पोस्टर सोशल मीडिया वरही आलं, मात्र, काही तासातच खडसेंच्या खऱ्या फोटोचं फोटोशॉप करुन ‘फडणवीस हटाव,महाराष्ट्र बचाव’ हा फलक धरल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक राजकीय ग्रुपवरही हा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियाच्या ट्रोलर्स आयतीच संधी मिळाली.

खडसेंचा हा फेक फोटो खडसेंच्या पक्षांतर्गत विरोधकांचा आहे की, आघाडी सरकार मधील समर्थक ट्रोलर्स ने तयार केला याची चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसेंना या फोटो बाबत विचारले असता, तो फेक फोटो असून कोणी तर खोडसाळपणा केला आहे. आम्ही त्याचा शोध घेत असल्याची प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.