Home > मॅक्स ब्लॉग्ज > रवींद्र महाजनींचा मृतदेह नव्हे तर कुटुंबव्यवस्थाच कुजत आहे

रवींद्र महाजनींचा मृतदेह नव्हे तर कुटुंबव्यवस्थाच कुजत आहे

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात आढळला. त्यांचा मृतदेह कुजेपर्यंत त्यांच्या मृत्यूची जाणीव नातेवाईकांना झाली नाही. रवींद्र महाजनी यांचा केवळ मृतदेहच कुजलेला नाहीय तर ही कुटुंबव्यवस्थाच आता कुजायला लागलीय. तिचा दुर्गंध आता येऊ लागला आहे. वाचा बदलत्या कुटुंबव्यवस्थेवर भाष्य करणारा सागर गोतपागर यांचा लेख...

रवींद्र महाजनींचा मृतदेह नव्हे तर  कुटुंबव्यवस्थाच कुजत आहे
X

रवींद्र महाजनी यांचा राहत्या घरात मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असणाऱ्या आंबी या गावातील त्यांच्या बंद घरातून वास येत असल्याबाबत शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. दरवाजा तोडल्यावर पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळून आला. तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपल्या अभिनयातून मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या एका अभिनेत्याच्या अशा एकाकी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या वेळेला त्यांच्यासोबत कोणी असतं किंवा दरवाजा उघडा असताना त्यांना कुणाची मदत मिळाली असती त्यांच्यावर उपचार झाला असता. किमान ही घटना टाळता आली असती. त्यांच्या मृत्यूची जराही कल्पना त्यांच्या कुटुंबियांना आली नाही. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी बदलत्या कुटुंबव्यवस्थेबाबत एका मुलाखती दरम्यान भीती व्यक्त केली होती. एकाच घरात वेगवेगळ्या खोल्या. त्या एका खोलीत वृद्ध आई असेल. तिला रात्री काही त्रास होत असेल हे दुसऱ्या खोलीतील कुटुंबियांना मुलांना समजणार कसं ? तिला अत्यावश्यक मदत मिळणार कशी? या अर्थाने पूर्वीच्या घरांची रचना अशी होती की कुणाला काही झालं तरी लगेच इतरांना समजायचं. रवींद्र महाजनी यांच्या मृत्युच्या दुःखद घटनेच्या निमित्ताने एकाकी पडलेल्या, हरवत चाललेल्या मानवी नातेसंबंधांविषयी भाष्य करणे महत्वाचे आहे. कारण या कुटुंबव्यवस्थेचाच मृतदेह आधुनिकिकरनाच्या काळात कुजत चालला आहे.

मानवी नातेसंबंधांमध्ये असलेले आपलेपणाचे वंगण हळूहळू कोरडे पडत चालले आहे. वेगवान जगाबरोबर वेगवान प्रवास करताना माणसाला एकमेकांना देण्यासाठी वेळच शिल्लक राहिलेला नाही. पूर्वी लोक एकमेकांशी भरभरून बोलायचे. कुणी भेटलं तर आनंद वाटायचा. त्याच्याशी आपुलकीने वागायचे. सध्याच्या कुटुंब व्यवस्थेत लोकांना कुटुंबियांना द्यायला देखील वेळ राहिलेला नाही. तितकीशी आपुलकी राहिलेली नाही. शहरांमध्ये तर जवळच्या घरात मृत्यू झालेल्याची देखील माहिती मिळत नाही. त्याला मदत पोहचत नाही. आपण जसजसे विकसित होत आहोत तसतसे आपल्यातील माणुसकी, आपुलकी संपत चालली आहे.

शहरीकरणाचा आधुनिकीकरणाचा कुटुंबव्यवस्थेवर विपरीत परिणाम

आधुनिक व्यवस्थेत प्रत्येकाला पंचतारांकित फ्लॅटची स्वप्ने पडतात. या नव्या घरांच्या रचनेमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या खोल्या असल्याने रात्री झोपताना वृद्ध व्यक्ती त्यांच्या खोलीत एकट्या झोपतात. अशा वेळी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगात वैद्यकीय मदत तातडीने पोहचत नाही. या उलट ग्रामीण आदिवासी भागातील परिस्थिती असते. घरातील मुले वृद्धांच्या खोल्यांमध्ये झोपत असतात. वृद्धांवर असा काही प्रसंग ओढवला तर मुलांकडून याची माहिती तातडीने पालकांना समजते. व त्यांना तात्काळ मदत मिळते.

वृद्धापकाळातील एकटे जीवन

अनेक उच्चपदस्थ अधिकारी, अभिनेते, संशोधक उतारवयात एकाकी पडण्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. त्यांची मुले एकतर परदेशात असतात. अथवा मोठ्या शहरात प्रस्थापित झालेली असतात. वृद्ध आईवडिल गावी असल्याने ते एकाकी पडतात. गावाकडे त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नसते. त्यामुळे त्यांना दुर्लक्षित आयुष्य जगावे लागते अथवा एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन रहावे लागते. आयुष्यभर कष्ट करून मुलांचे संगोपन करून त्यांना उच्च विद्याविभूषित करूनही या मुलांना आई वडिलांकडे पहायला वेळ नसतो. सध्या निर्माण झालेली ही कौटुंबिक व्यवस्था ही या भांडवली जगण्याचे उत्पादन आहे.

या उलट ग्रामीण आदिवासी जीवन

शहरातील या परिस्थितीचा हळूहळू ग्रामीण आणि आदिवासी जीवनावर देखील परिणाम होत आहे. पण या भागातील नातेसंबंधांची वीण अद्यापही उसवलेली नाही. गरजेच्या काळात एखाद्या कुटुंबासोबत संपूर्ण गाव उभा राहतो. आजही येथील लोकांना कुणी भेटलं तर आनंद होतो. लोक एकमेकांशी भरभरून बोलतात. एकमेकांना वेळ देतात. त्यांच्या या वागण्यात कुठेही अभिनय नसतो. या भागातील नातेसंबंधामधील वंगण अजूनही कोरडे पडलेले नाही. एखाद्या कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतात. ग्रामीण भागातील ही कुटुंबव्यवस्था टिकण्यामागे येथील लोकांचे सामुहिक जीवन कारणीभूत आहे. लोकांच्या गरजा एकमेकांवर अवलंबून असल्याने नातेसंबंधांची वीण अजूनही घट्ट आहे.

शहरातील बदलत्या कुटुंबव्यवस्थेने ग्रामीण आदिवासी भागातील कुटुंबव्यवस्थेच्या अनेक गोष्टी अंगीकारण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील या गोष्टी जश्याच्या तशा अंगीकारणे बदलत्या काळात शक्य नसले तरीही घरांच्या रचना, वृद्धांचे संगोपन करण्याची जबाबदारी आणि ही जबाबदारी पार पाडण्याचे नैतिक अधिष्टान हे जरी स्वीकारले तरीही आधुनिकीकरणामुळे निर्माण झालेल्या या कौटुंबिक समस्या कमी होतील...

Updated : 16 July 2023 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top