Home > News Update > मानवीहक्क कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदेंना सक्तवसुली संचलनालयाची नोटीस

मानवीहक्क कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदेंना सक्तवसुली संचलनालयाची नोटीस

मानवीहक्क कार्यकर्ते अ‍ॅड. असीम सरोदेंना सक्तवसुली संचलनालयाची  नोटीस
X

एकनाथ खडसेंच्या भोसरी भुखंड घोटाळ्याबाबत ईडीने सुरु केलेल्या चौकशी संदर्भात अ‌ॅड.असीम सरोदे यांना ईडी कार्यलयातून फोन आला असून ईडीचे अधिकारी सरोदे यांच्या कार्यालयात पोहोचून कागदपत्र तपासणार आहे.

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. परंतु कोरोनाची लागण झाल्यामुळे खडसे क्वारंटाईन झाले. "माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस आहे. यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु" असं सांगत खडसेंनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती.

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना नोटीस बजावल्याची जोरदार चर्चा आहे. जळगावमधील कथित बीएचआर घोटाळा त्यांनी बाहेर काढल्याने भाजप नेते गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोटाळ्यावर कारवाई होण्याआधीच खडसेंवर ईडीची कारवाई करुन त्यांना अडचणीत आणलं जाऊ शकतं. एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तूर्तास त्यांची ईडी चौकशी पुढे ढकलली गेली आहे. परंतु हजेरीची टांगती तलवार कायम आहे.

खडसेंनी भाजपमध्ये असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले होते. आता राष्ट्रवादी प्रवेशानंतर समर्थक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना फोडून ते भाजपला मोठं खिंडार पाडण्याची भाजपला भीती असावी. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यास खडसे सक्षम असल्याचं मानलं जातं, त्यामुळेच खडसेंचा मेरु रोखण्यासाठी भाजपने ईडीचे शस्त्र उगारल्याचीही चर्चा आहे.

एकनाथ खडसे कोरोनामुळे चौकशीला येत नाही हे पाहत ईडीने पर्यायी चौकशीचा फास आवळला आहे. त्याचाच भाग म्हणुन वकिल आणि मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची चौकशी होत आहे. मॅक्स महाराष्ट्रने याबाबत अॅड. सरोदेंशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी नोटीस मिळाल्याचे सांगितले असून ईडीची कार्यालयातून फोनही आला होता, ईडीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे अॅड. सरोदे यांनी स्पष्ट केलं.

Updated : 5 Jan 2021 11:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top