अद्याप तरी संजय राऊत किंवा वर्षा राऊत यांच्याकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे.
या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी ३० डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे.
खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, "आमच्या शिवसेनेच्या लोकांनाही नोटीस आल्या आहेत. जे तुमच्या विरोधात आहेत, ज्यांच्याशी तुम्ही राजकीय सामना करु शकत नाही अशा लोकांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सकडून बळाचा वापर करुन नमवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तसं होणार नाही. यासाठीच विरोधी पक्षाने एकत्र यावं आणि मजबूत संघटन उभं करावं अशी आमची भूमिका आहे," असं सांगितलं होतं.