Home > News Update > डॉ. विशाखा शिंदे यांचा दोष तरी काय? ; डॉ. जयश्री तोडकर यांचा ट्विट करत सवाल

डॉ. विशाखा शिंदे यांचा दोष तरी काय? ; डॉ. जयश्री तोडकर यांचा ट्विट करत सवाल

डॉ. विशाखा शिंदे यांचा दोष तरी काय? ;  डॉ. जयश्री तोडकर यांचा ट्विट करत सवाल
X

अहमदनगर// अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात 6 नोव्हेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेबाबत कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहा जणांवर कारवाई करण्यात आली. त्यात 4 कर्मचाऱ्यांना तोफखाना पोलिसांनी अटक देखील केली. भा.द.वि 304 आणि 304 ए कलमाखाली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, याविरोधात जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मागील 5 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी घाई घाईने अटकेची कारवाई केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान , या घटनेतील खऱ्या दोषींना सोडून दुसऱ्यांनाच पोलिसांनी अटक केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. बेरियाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी देखील ट्विट करत अटक करण्यात आलेल्या डॉ. विशाखा शिंदे यांच्यावर भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, फोटो मध्ये दिसत आहेत त्या डॉ. विशाखा शिंदे. मागील ५-६ दिवसापासून त्या जेल मध्ये आहेत. त्यांचा गुन्हा काय? अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. डॉ. विशाखा ह्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अस्थीरोग (Orthopedics) विभागात पदव्युत्तर पदवीका (Post-graduate diploma) करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. थोडक्यात काय तर त्या अस्थीरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनी आहेत.

ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी कोविड रुग्णांवर उपचार चालू असणाऱ्या ICU विभागात काही कारणांमुळे आग लागली. त्या कारणाचा शोध पोलीस व शासनाच्या इतर यंत्रणा करत आहेत. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. विशाखा ह्या त्या दिवशी या विभागात ड्युटी वर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा ह्यांना या प्रकरणी दोषी ठरवले गेले. आरोग्य विभागाने यांना निलंबित केले तर पोलीस विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक केली.

निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा ह्या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. परंतु , पोलिस विभागाने मात्र त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आणि डॉ. विशाखा यांच्या अडचणीत वाढ झाली. त्या आजतागायत कोठडीमध्ये आहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

दरम्यान Maharashtra Association of Resident Doctors (MARD) ही महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची सगळ्यात मोठी संघटना आहे. डॉ. निवासी डॉक्टर असुनही केवळ त्या CPS अंतर्गत शिकणाऱ्या निवासी डॉक्टर आहेत म्हणून या संघटनेने या घटनेपासून स्वतःला वेगळे ठेवले. साधे पत्र काढून डॉ. विशाखा ह्यांना समर्थन देण्याची तसदीही या संघटनेला घेऊ वाटली नाही. IMA, NIMA, MAGMO ह्या आणि इतर डॉक्टर संघटना सुद्धासमोर यायला तयार नाहीत.अशी खंत डॉक्टर तोडकर यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केली.

सोबतच त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, डॉ. विशाखा ह्या एक MBBS डॉक्टर आहेत. त्या एक डॉक्टर आहेत या नात्याने तरी या संघटनांनी त्यांना पाठिंबा देत मदत करायला हवी होती. पण ती मदत होताना दिसत नाही.

डॉ. विशाखा ह्या एका सरकारी रुग्णालयात आपली जबाबदारी बजावत होत्या. त्या तिथे एक शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होत्या. रुग्णालय प्रशासन आणि नियोजन यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. त्यामुळे जर काही तांत्रिक कारणांमुळे आग लागली असेल तर डॉ. विशाखा ह्यांना त्या प्रकरणी दोषी ठरवणे सर्वस्वी चुकीचे आहे. रुग्णालयातील आग रोधक यंत्रणा आणि त्याची तपासणी याच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही. तरीही त्यांना या प्रकरणी गोवण्यात येत आहे. डॉ. विशाखा ह्यांचा बळी देऊन खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची ही खेळी आहे. ड्युटीवर असणारा डॉक्टर रुग्ण तपासणी करेल की वार्ड मधील वायरी आणि इलेक्ट्रॉनिक वास्तू तपासेल? असा संतप्त सवाल डॉ. तोडकर यांनी उपस्थित केला आहे.

पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजात नावारुपाला येण्याच्या डॉ. विशाखा ह्यांच्या स्वप्नाला ह्यामुळे सुरुंग लागला आहे. आज डॉ. विशाखा आहेत, उद्या तुम्ही किंवा मी असु शकेल. त्यामुळे ह्या विरोधात बोलले गेलेच पाहिजे. एक डॉक्टर म्हणून डॉ. विशाखा ह्यांना त्यांच्या प्रोफेशन मधील माणसांची गरज आहे. आपल्या वैयक्तिक पातळीवर तसेच आपण ज्या कुठल्या संघटनेत असाल त्या संघटनेच्या पातळीवर डॉ. विशाखा ह्यांना समर्थन आपण कराल आणि एका आपल्यातीलच डॉक्टरच आयुष्य उध्वस्त होण्यापासून त्यांना वाचवाल ही अपेक्षा असं आवाहन डॉ. तोडकर यांनी केलं आहे.

Updated : 14 Nov 2021 3:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top