Home > News Update > भीमाची वाघीणी बनुबाई येलवे काळाच्या पडद्या आड

भीमाची वाघीणी बनुबाई येलवे काळाच्या पडद्या आड

भीमाची वाघीण अशी ओळख असलेल्या बनुबाई येलवे यांचे कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारादरम्यान निधन झाले.

भीमाची वाघीणी बनुबाई येलवे काळाच्या पडद्या आड
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेत अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आणि भीमाची वाघीण अशी ओळख असलेल्या बनुबाई येलवे यांचे कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांनी आंबेडकरी चळवळीत आयुष्यभर काम केले होते. रविवारी रात्री 2 वा. त्यांचे निधन झाले.



बनुबाई यांनी लोकांच्या प्रश्नावर अनेक मोर्चे काढून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला. तसेच भ्रष्ट तलाठ्याच्या गळ्यात चपलाचा हार घालण्याचे धाडसी कृत्य बनुबाई यांनी केले होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्या शालिनी पाटील यांच्या चेहऱ्याला काळे फासण्याचे आंदोलन बनुबाई यांनी केले.



याबरोबरच नदीतील वाळू उत्खननाचे दुष्परिणाम प्रशासनाला कळावे म्हणून त्यांनी एकदा तहसीलदार कराड यांच्या दालनात मृत मासे आणून टाकले होते. रेशन दुकानात मिळणारे निकृष्ठ धान्य अनेकदा बनुबाइनी त्या कार्यालयात अधिकाऱ्याच्या समोर आणून हे पहिल्यांदा तुम्ही खावे, अशी भूमिका घेतलेली होती. राज्यात कुठेही जातीय अत्याचार झाला कि त्यांचा मोर्चा ठरलेला असे. जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या की, त्या प्रत्यक्ष तिथे भेट देत असत. त्यांनी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम केले. रिपाई नेते रामदास आठवले यांच्याशी त्यांचे चांगले सौख्य होते. रिपाई च्या विविध गटांची युती व्हावी सर्वांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सर्व नेत्यांना त्यांनी खरमरीत पत्रे लिहिली होती.



परिसरातील कुणाचे प्रशासनातील काम अडले की लोक तडक बनुबाइचे घर गाठायचे. मग स्वतः त्या कार्यालयात जाऊन समस्या सोडवली जायची. प्रशासन अधिकाऱ्यानी लोकांचे म्हणणे ऐकले नाही कि त्या थेट कार्यालयात धिंगाणा करायच्या. बनुबाई येलवे आपल्या कार्यालयाच्या आवारात आल्या की अधिकाऱ्याना धडकी भरायची. एकदा शालेय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळत नव्हते. अधिकारी कार्यालयात त्यांची दाद घेत नव्हते. बनुबाई कार्यालयाबाहेर आल्या आणि त्यांनी जोरजोरात बोंब ठोकायला सुरवात केली. दाखले मिळेपर्यंत मी थांबणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. अधिकाऱ्यानी बाहेर येऊन तात्काळ दाखले देण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे त्यांनी विविध क्षेत्रात काम केले. महिला केवळ महिला आघाडीच्या नेतृत्व करतात पण बनुबाईनी यांचे नेतृत्व कामातून तयार झाले. सर्वच आघाड्यांवर त्यांनी नेतृत्व केले. त्यांनी आवाज देताच शेकडो महिला रस्त्यावर यायच्या. अशा प्रकारे बनुबाई येलवे यांची भीमाची वाघीण अशी ओळख होती. त्यांचे कराडमधील रुग्णालयात निधन झाले.

Updated : 22 Aug 2022 5:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top