Home > News Update > कॉग्रेस राष्ट्रवादीला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते का?

कॉग्रेस राष्ट्रवादीला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते का?

कॉग्रेस राष्ट्रवादीला राष्ट्रपती राजवटीची भीती वाटते का?
X

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असला तरी शिवसेना (shivsena) भाजपने (BJP)सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. आणि त्यात सत्तास्थापनेसाठी चर्चाही सुरू दिसत नाही. त्यामुळे सत्ता स्थापन कोण करणार? अशी उत्सुकता सर्वाना लागली आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद (chief ministers) देण्यास स्पष्ट नकार दिल्यानं तिढा अधिक वाढला आहे.

त्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. असं वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केलं आहे. त्यामुळे कॉग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धास्ती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये म्हणून आता सोनिया गांधी(Sonia Gandhi) आणि शरद पवार(shard pawar) या दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर शिवसेनेला पाठींबा दयायचा की नाही? असा निर्णय घेतला जाणार असल्याचं राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

केंद्रात भाजप सरकार आहे आणि अमित शहा(Amit shah) यांच्या हातात गृहमंत्रीपद आहे. अमित शहा यांची कार्यपद्धती पाहता ते राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी पाऊलं उचलू शकतात. जम्मू काश्मिरच्या संदर्भात भाजपने घेतलेली भूमिका सर्वश्रूत आहे. भाजपच्या या पावित्र्याने विरोधी पक्ष नाराज झाला होता, पण कुणालाही न जुमानता भाजपने हे करून दाखवलं होतं.

दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अनेक नेते इडी चौकशीच्या फे-यात अडकले आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर या चौकशाना अधिक वेग येऊ शकतो. कॉग्रेस नेत्यांनाही याची भीती आहे. त्यामुळे शिवसेना भाजप सोबत सत्ता स्थापन करू शकत नसेल तर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठींबा द्यावा. असा एक मत प्रवाह दोन्ही पक्षात आहे.

भाजपला नामोहरण करायचं असेल तर ही एक संधी आहे असं अनेक नेत्यांना वाटतं. राष्ट्रवादी कॉग्रेसला शिवसेनेला पाठींबा देणं सोप्पं आहे. पण कॉग्रेसला हे अडचणीचं ठरू शकतं. शिवसेनेची स्वातंत्र्यवीर सावरकर, राममंदिर, उत्तर भारतीय यांच्या संदर्भात वेळोवेळी शिवसेनेने घेतलेली भूमिका पहाता कॉग्रेसला याचा तोटा होऊ शकतो असं काही कॉग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी या वर आपली कोणतीही भूमिका घेतलेली नाही. शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रातील परिस्थितीची जबाबदारी देऊन कॉग्रेस आपला हात आखडता घेऊ शकते. यासाठीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट महत्वाची मानली जात आहे.

शरद पवार आणि संजय राऊत यांचे सबंध अत्यंत जवळचे असून संजय राऊतांसाठी ही एक मोठी संधी आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास संजय राऊत यांचं वजन शिवसेनेत वाढू शकतं, त्यामुळे संजय राऊत भाजपच्या प्रत्येक विधानावर टीका करत आहेत. उध्दव ठाकरे यांनीही संजय राऊत यांना मोकळीक दिली असून जेव्हढे दिवस चर्चा सुरू राहील तेव्हढीच मंत्रीपदं शिवसेनेकडे येतील. अशी भूमिका घेऊन शिवसेना पुढे जात असून अजून शिवसेना आणि भाजपचे कोणतेही मोठे नेते सत्तास्थापनेसाठी एकमेकांना भेटलेले नाहीत. प्रसाद लाढ आणि मिलिंद नार्वेकर मात्र, एकमेंकांशी फोनवरून संपर्कात असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

Updated : 2 Nov 2019 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top