Home > News Update > झिका व्हायरसचा पुण्यात प्रवेश, नगरकरांना सावध होण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन

झिका व्हायरसचा पुण्यात प्रवेश, नगरकरांना सावध होण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन

राज्यात पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस आढळून आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

झिका व्हायरसचा पुण्यात प्रवेश, नगरकरांना सावध होण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन
X

राज्यात पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस आढळून आल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आरोग्य यंत्रणेने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत झिका विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

झिका विषाणू नेमका काय आहे?

केरळ नंतर महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला आहे. झिका हा डासामार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार असून फलॅव्हीव्हायरस प्रजातीच्या एडिस डासांमार्फत पसरतो. झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यू आजारासारखी असतात. यामध्ये ताप, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी इ.लक्षणे आढळतात. ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरुपाची असून 2 ते 7 दिवसांपर्यंत राहतात. झिका आजारामध्ये दवाखान्यात भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही तसेच या आजारात मृत्यूचे प्रमाणही नगण्य आहे. या आजाराचा त्रास जाणवू लागल्यास रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी, निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थाचे सेवन करावे. तापाकरिता पॅरासिटामॉल औषधे वापरावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणतीही लस उपलब्ध नाही

झिका आजारावर कोणतेही विशिष्ट ओषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. तापरूग्ण व किटकशास्त्रीय सर्वेक्षणासाठी घरी आलेल्या आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य करा तसेच ताप आल्यास तात्काळ नजीकच्या शासकिय अथवा खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा, अहमदनगर जिल्ह्यात सध्यस्थितीत झिका आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कोरडा दिवस पाळण्याचे नगरकरांना आवाहन

झिका हा एडिस डासापासून होणारा आजार आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती रोखण्याकरिता अहमदनगर जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना हिवताप विभागाकडून करण्यात येत आहेत. जनतेने डासांची उत्पत्ती होऊ नये याकरिता आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घर व परिसरात पाणी साचू देऊ नये, तसेच परिसरातील निकामी व निरुपयोगी वस्तूची तात्काळ विल्हेवाट लावावी,परिसर स्वच्छता ठेवावा, असे आवाहन डॉ. साळुंके यांनी केले आहे.

Updated : 3 Aug 2021 3:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top