Home > News Update > दिलीप कुमार अमर आहेत!

दिलीप कुमार अमर आहेत!

दिलीप कुमार अमर आहेत!
X

दिलीप कुमार म्हणजे अभिनयाच्या सल्तनतीचे बेताज बादशहा होते. ते केवळ सर्वश्रेष्ठ अभिनेतेच नव्हते तर अभिनयाची ती एक चालती बोलती संस्था होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच, ते तर युसूफ खान होते. दिलीप कुमार अमर आहेत अशा शब्दात सामना संपादकीय मधून दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली आहे.

ट्रेजेडी किंग दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर आज सामना संपादकीय मधून शब्दांजली वाहण्यात आली आहे. जागतिक कीर्तीचे महान कलावंत दिलीप कुमार अर्थात युसूफ खान यांचे निधन म्हणजे चित्रपटसृष्टीतील एका प्रदीर्घ कालखंडाची अखेर आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यासाठी देशाच्या चित्रपटसृष्टीचा श्वासही काही काळ थांबला असेल. वयाच्या विशीत युसूफ खान या नावाचा एक तरुण चित्रपटसृष्टीत येतो आणि सरिता स्वतःचा मार्ग स्वतः बनविते त्याप्रमाणे प्रखर आत्मविश्वास, कलेवरील अढळ निष्ठा आणि प्रत्यक्ष काम चोखपणे पूर्णत्वाला नेण्याची जिद्द याची कास धरून आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. दिलीप कुमार हा चित्रपटसृष्टीतील एक चमत्कारच म्हणायला हवा.

शंभरीपर्यंत पोहोचतानाच त्यांचे झालेले निधन म्हणजे परिपूर्ण जीवनाची समाप्ती आहे. गेली अनेक वर्षे ते कॅमेऱयासमोर आणि पडद्यावर नव्हते. तरीसुद्धा दिलीप कुमार नसलेली हिंदुस्थानी चित्रपटसृष्टी म्हणजे नेहरू-गांधी, ठाकरे, वाजपेयी नसलेले हिंदुस्थानी राजकारण आहे. राजबिंडे रूप, जबरदस्त संवादफेक, अनेकदा सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा 'अँग्री यंग मॅन', तितकाच भावुक, प्रेमळ, त्यातून निर्माण झालेला 'टॅजेडी किंग' अशा विविध रूपांत दिलीप कुमारने हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा पडदा व्यापला. ''मैने हमेशा अपने जूतों का साइज अपने पावसे बडा रखा है'' असा डायलॉग फेकत चित्रपटांतून विजेचा करंट सोडणारा दिलीप कुमार म्हणजे हिंदुस्थानी सिनेसृष्टीचा मोहराच होता. हा 'मोहरा' आपल्यातून निघून गेला, हे मानायलाच मन तयार होत नाही. अभिनयाचा बेताज बादशहा असलेले दिलीप कुमार तर अजरामर आहेत. ते जातील कसे? मग पृथ्वीच्या पोटात जे निश्चेष्ट कलेवर आज दफन झाले, ते कुणाचे होते? जो शरीक-ए-खाक झाला, तो एक सर्वसामान्य देह होता इतरांसारखाच…आणि जो शरीक-ए-रूह आहे, ते असामान्य दिलीप कुमार येथेच आहेत. ते जिवंत आहेत पडद्यावर आणि लाखो-करोडो चाहत्यांच्या मनःपटलावर. या पडद्यावरून दिलीप कुमारांना कोण हटविणार? त्यांचे तुफान गाजलेले चित्रपट, अभिनयाची शैली व रसिकांच्या कानांत घर करून असलेली संवादफेक कोणाला हिरावून घेता येईल? गॉड, ईश्वर, अल्लाह या संकल्पना मनुष्यलोकातील एखादा देह नेऊ शकतील, पण दिलीप कुमार यांचा अदबशीर आणि

घेऊन जाण्याची गुस्ताखी त्यांना तरी करता येईल काय? दिलीप कुमार म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं. ते स्वप्न लौकिक अर्थाने आज लुप्त झाले असले, तरी सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा हा अढळ तारा भविष्यातही लकाकत राहील, चकाकत राहील. उत्तम नट होण्यासाठी अभिनयाच्या वाटेवर धडपडणाऱया, चाचपडणाऱया प्रत्येक कलाकारास फिल्म इंडस्ट्रीचा हा पहिला सुपरस्टार दीपस्तंभाप्रमाणे दिशादर्शन करत राहील. दिलीप कुमार यांच्यासारख्या अभिनयसंपन्न आणि सुसंस्कृत व्यक्तित्त्वाचे आयुष्य तसे आकडय़ात मोजायचे नसते. शंभरीच्या आसपास पोहचलेले वयोमान, थकलेले शरीर, अल्झायमरसारखा असाध्य आजार पाठीमागे लागलेला असतानाही चित्रपटातील नायकाप्रमाणेच ते आजारपणाशी लढत राहिले.

पत्नी सायरा बानो सदैव सावलीसारख्या त्यांच्यासोबत असायच्या. ट्रजेडी किंग दिलीप कुमार यांच्या चित्रपटांतील शोकात्म शेवटाप्रमाणेच ही लढाई आज संपली. पाकिस्तानातल्या पठाण कुटुंबातील फळविक्रेत्याचा मुलगा असलेल्या दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान. पठाण या राकट अक्षराशी जराही साम्य नसलेला शांत व एकांतप्रिय युसूफ खान मुंबईत येतो, लहानाचा मोठा होतो, शिकतो, पुण्यामध्ये लष्कराच्या छावणीत कॅण्टीन चालवितो, तिथे बॉम्बे टॉकीजच्या देविका रानींची या तरुणावर नजर पडते, युसूफ खान हे नाव रोमँटिक हिरोला 'सूट' होणार नाही म्हणून त्याचे नाव बदलून दिलीप कुमार ठेवले जाते आणि तोच दिलीप कुमार फिल्म इंडस्ट्रीचा पहिला सुपरस्टार बनण्याचा इतिहास घडवितो. हा सगळाच प्रवास विस्मयकारक आहे. पैशासाठी भाराभर चित्रपट साईन न करता दिलीप कुमार यांनी मोजकेच साठेक चित्रपट केले. प्रत्येक भूमिका केली ती जीव ओतूनच.

त्यांच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू म्हणजे देवदास! बिमल राय यांच्या या चित्रपटातील पारो व देवदास यांच्या प्रेमकहाणीत दिलीप कुमार यांनी सर्वस्व ओतले. त्यासाठी शरच्चंद्रांच्या मूळ कादंबरीची त्यांनी पारायणे केली. पारोवरचे अथांग पेम, तिच्या वियोगाची वेदना आणि तीच नसल्यामुळे निरर्थक बनलेले आयुष्य मद्याच्या पेल्यांत उद्ध्वस्त करून घेणारा देवदास दिलीप कुमार यांनी ज्या ताकदीने उभा केला आहे, तो रोमांचक आहे. 'नटसम्राट'नंतर श्रीराम लागूंना जसा शोकात्म भूमिकेतून बाहेर पडताना त्रास झाला, तसाचा त्रास दिलीप कुमार यांना देवदास साकारताना झाला. दिलीप कुमार इतके काम करायचे की, ते भूमिकेत न शिरता भूमिकाच त्यांच्यात शिरायची. त्यामुळेच 'देवदास'नंतर त्यांना मानसोपचार घ्यावे लागले. 'हलचल'मधील त्यांचा शोकात्म अभिनय, 'दाग'मधील व्यसनी शंकरची भूमिका अशीच शहारे आणणारी होती. ट्रजेडी किंगच्या शिक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी नया दौर, आझाद, कोहिनूर या चित्रपटांत जिंदादिल नायकाच्या भूमिका केल्या. माणूस विरुद्ध यंत्र आणि गरीब विरुद्ध श्रीमंत या संघर्षात बंड करणारा, पेटून उठणारा टांगेवाला शंकर दिलीप कुमार यांनी उभा केला. 'उडे जब जब जुल्फे तेरी…'सारख्या एकाहून एक सरस गाण्यांबरोबरच दिलीप कुमार यांच्या कसदार अभिनयामुळे 'नया दौर' सुपरहिट झाला. 'राम और श्याम' हा तर हिंदी चित्रपटसृष्टीतील दुहेरी भूमिका असलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट. 'गंगा जमना'मधील रांगडा नायक पुढे हातात बंदूक घेऊन दरोडेखोर बनतो.

एकाच चित्रपटातील हे स्थित्यंतर दिलीप कुमार यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारले आहे. 'दिदार' चित्रपटात अंध नायकाची भूमिका करताना ही भूमिका हुबेहूब अंध व्यक्तीची वाटावी, यासाठी ते अंध लोकांसोबत राहिले. डोळ्यांतून व्यक्त होण्याचे अद्भुत कसब, चेहऱयावरील हावभाव आणि संवादफेकीवर असलेले कमालीचे प्रभुत्व ही दिलीप कुमार यांच्या अभिनयाच्या भात्यातील प्रमुख शस्त्रे होती. शिवाय अफाट वाचन आणि व्यासंगातून त्यांच्या अभिनयात एक निराळी खोली झळकत असे. मात्र, दिलीप कुमार यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली, ती 'मुगल ए आझम' या सुपरहिट चित्रपटामुळे. अनारकलीसोबत हळुवार प्रेम फुलविणारा राजपुत्र सलीम आणि या प्रेमकहाणीस कडाडून विरोध करणाऱया शहेनशहा बापाचे साम्राज्य लाथाडून संघर्ष करणारा प्रेमवीर कोण विसरू शकेल? नायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर क्रांती, शक्ती, कर्मा या चित्रपटांत चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी जबरदस्त ठसा उमटवला.

दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण अभिनयाचे सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार आजही दिलीप कुमार यांच्याच नावावर आहेत. काही काळ ते राज्यसभेचे सदस्यही होते. मूळ पाकिस्तानचे असलेल्या दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारनेही 'निशान-ए-इम्तियाज' हा सर्वोच्च नागरी किताब दिला होता. पाकिस्तानचा हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल शिवसेनाप्रमुखांनी दिलीप कुमार यांच्यावर कठोर टीका केली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेनाप्रमुखांच्या मैत्रीत त्यांनी कधी अंतर पडू दिले नाही. दिलीप कुमार म्हणजे अभिनयाच्या सल्तनतीचे बेताज बादशहा होते. ते केवळ सर्वश्रेष्ठ अभिनेतेच नव्हते तर अभिनयाची ती एक चालती बोलती संस्था होती. हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास म्हणजे दिलीप कुमार. तो इतिहास अजरामर आहे. त्यामुळे आज ज्यांनी जगाचा निरोप घेतला ते दिलीप कुमार नव्हतेच. ते तर युसूफ दान होते. दिलीप कुमार अमर आहेत! असा शेवटी सामना संपादकीय मधून सांगण्यात आलं आहे.

Updated : 8 July 2021 2:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top