Home > News Update > अखेर बीड जिल्हा परिषद धनंजय मुंडेंच्या ताब्यात

अखेर बीड जिल्हा परिषद धनंजय मुंडेंच्या ताब्यात

अखेर बीड जिल्हा परिषद धनंजय मुंडेंच्या ताब्यात
X

बीड जिल्हापरिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यात अखेर धनंजय मुंडेंना यश आलं आहे. परळी विधानसभेत पंकजा मुंडेंना पराभूत केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेत भाजपची म्हणजेच पंकजा मुंडेंची सत्ता हिसकावून घेतलीय. यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी धक्का दिलाय.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी 4 जानेवारीला झालेल्या मतदानानंतर सुरेश धस गटाच्या पाच सदस्यांच्या मुद्द्यावरून राखीव ठेवलेला निकाल आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने जाहीर करण्यात आला आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिवाजी शिरसाठ तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची निवड आज जाहीर करण्यात आलीय.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवलेले असल्यामुळे ४ जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व 13 जानेवारीला न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश दिले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे ते बंद पाकीट उघड करण्यात आले.

हे ही वाचा...

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीच्या बाजूने ३२ तर भाजपच्या बाजूने २१ मते असल्याचे निष्पन्न झाले. मतदानाचा अधिकार गोठवलेल्या त्या ५ सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष-उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी ठरतात या निकषावर न्यायालयाने निकाल जाहीर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. निवडणुकाधी झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला राष्ट्रवादीनं न्यायालयात आव्हान दिले होते.

दरम्यान त्या पाच सदस्यांचे मतदान करण्याचे अधिकार गोठवलेले असले तरी त्यांच्या रिट याचिकेला उच्च न्यायालयाने दाखल करून घेत लवकरात लवकर त्याबाबतही सुनावणी होईल असे म्हटले आहे. पण महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जुळवलेले संख्याबळ पाहता अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचा आज घोषित केलेला निकालच कायम राहण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार शिवकन्या शिरसाठ ह्या येत्या दोन दिवसात स्विकारणार आहेत तर उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी पदभार स्वीकारला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याची रणनीती पंकजा मुंडे यांनी आखली होती. पण

राष्ट्रवादीनं धस गटाच्या पाच सदस्यांच्या मुद्यावर कोर्टात धाव घेतली. तसंच महाविकास आघाडीचं संख्याबळ जास्त असल्यानं धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे निकालाआधाची ट्विट करत पराभव स्वीकारत असल्याचं जाहीर केलं होतं.

Updated : 14 Jan 2020 9:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top