Home > News Update > फडणवीसांची पावलं व्हाया सिलीगुडी दिल्लीच्या दिशेने?

फडणवीसांची पावलं व्हाया सिलीगुडी दिल्लीच्या दिशेने?

फडणवीसांची पावलं व्हाया सिलीगुडी दिल्लीच्या दिशेने?
X

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ झालेल्या रॅलीचं नेतृत्व केलं. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी इथ झालेल्या रॅलीत फडणवीस सहभागी झाले होते. CAA आणि NCR कायद्याच्या समर्थनार्थ भाजपकडून व्यापक जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर पहिल्यादांच फडणवीस यांनी राज्याबाहेर जाऊन पक्षाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे फडणवीसांची आगामी वाटचाल कुठे सुरू यावर चर्चा सुरु झालीये.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपुरातही भाजपकडून नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढण्यात आला होता. केद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये भाग घेतला होता. मात्र राष्ट्रीय वृत्तपत्रांनी मुख्यत्वे नितीन गडकरी यांच्या भाषणाला ठळक प्रसिध्दी दिली होती. आतापर्यंत नागपुरात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात फडणवीसांना प्रसिध्दी दिली जायची.

राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही भाजप सत्तेबाहेर आहे. सत्ता गमावल्यामुळे अस्वस्थ भाजप नेते यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोप करत आहेत. सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मनमानी पध्दतीने निर्णय घेतले. मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्रीय पध्दतीने राज्याचा कारभार हाकला अशी तक्रार भाजपसह शिवसेनेचे नेतेही करतात. पक्षातही फडणवीस सांगे आणि पक्ष हाले अशीच परिस्थिती होती. मात्र मोदी-शाहांकडे तक्रार करण्याची हिंमत भाजप नेत्यांनी केली नाही. किंबहूना मोदी- शाहा भेटसाठी वेळही देत नाही अशीही तक्रार भाजपच्या काही जेष्ठ नेत्यांनी केलीये.

८० तासाचं सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात हलवण्यात येईल अशी कूजबूज होती. मात्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची माळही फडणवीस यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची पक्षावरील पकड़ ढिली झालेली नाही हे सिद्ध झालं. त्याचबरोबर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन फडणवीस यांचाच शब्द भाजपमध्ये अंतिम असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र अलिकडे झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्राबल्य असलेल्या जातीच्या नेत्यांना वगळून केंद्रीय पध्दतीने थोपलेलं नेतृत्व अपयशी होतांना दिसतंय. झारखंडसारख्या आदिवासीबहुल राज्यात भाजपने ओबीसी असलेले रघुवर दास यांचं नेतृत्व थोपलं. मात्र झारखंडच्या जनतेने हे मान्य केलं नसल्याचं निकालावरुन स्पष्ट झालं. जाटबहूल हरियाणामध्ये खत्री समाजाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे दुसऱ्यांदा भाजपला बहुमत मिळवून देण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्रतही बिगरमराठा असलेले फडणवीस यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये मिळवलेल्या जागांएवढ्या जागा राखता आल्या नाही. त्यामुळे फडणवीस यांना केंद्रात हलवण्याबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गंभीरपणे विचार करण्यास सुरुवात केली आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी नागरिकत्व कायद्यावर मोर्चे सुरु असतांना देवेंद्र फडणवीस यांना मात्र पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात आल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.

मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागणार असल्याचं अनेक भाजप नेते छातीठोकपणे सांगत होते. मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर सर्व माजी मुख्यमंत्र्यांना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर घेण्यात आलं, मात्र देवेंद्र फडणवीसांना राज्यात पुन्हा संधी देण्यात आली. त्यानंतर भाजपच्या पंकजा मुंडेंपासून ते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप करुन त्यांच्या नेतृत्वाला एकप्रकारे आव्हान दिलं. मात्र पराभव झाल्यानंतर तातडीनं बदल करण्याची काँग्रेससारखी पंरपरा भाजपमध्ये नाही. तसं केल्यास वेगळा संदेश जाऊ शकतो असं भाजप हायकमांडला वाटते. त्यामुळे भाजपमध्ये शस्त्रक्रीया हळूहळू करण्याची रित आहे. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना हळूहळू केंद्र स्तरावर सेट करण्याची ही सुरुवात असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे. त्यामुळे आगामी काळात देवेंद्र फडणवीस यांची वाटचाल केंद्रात होते का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Updated : 24 Dec 2019 3:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top