Home > News Update > 'हा' तर नुरा कुस्तीचा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

'हा' तर नुरा कुस्तीचा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

हा तर नुरा कुस्तीचा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
X

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भांडाफोड केलेल्या पेनड्राईव्हमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यावर प्रतिक्रीया देतांना वंचित बहूजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी हा तर नुरा कुस्तीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत 120 तासांचे फुटेज सभागृहाच्या सभापतींकडे दिले होते. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काल विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या सभापतींकडे पेनड्राईव्ह सादर केला. त्यामध्ये वक्फ बोर्डाचे सदस्य असलेल्या डॉ. लांबे यांचे दाऊदशी कसे संबंध आहेत, ते सांगणारी एक ऑडिओ क्लिप सभागृहासमोर सादर केली. तसेच याआधीही फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करत एक पेनड्राईव्ह सभागृहाच्या सभापतींकडे सादर केली. त्याला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही विधानसभेत प्रत्युत्तर दिले. मात्र या प्रकरणावरून राज्यात खळबळ उडाली असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी मागील अनेक दिवसांपासून सांगत आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी नुरा कुस्ती खेळू नये. विधानसभेच्या तालिका अध्यक्षांकडे पेन ड्राईव्ह देणे हा नुरा कुस्तीचा एक प्रकार आहे. त्यामुळे फडणवीस यांनी खऱ्या पैलवानासारखे मैदानात येऊन कुस्ती करावी. कारण त्या पेनड्राईव्हमध्ये जे आहे ते सर्वांसमोर आले पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांनी नुरा कुस्ती न खेळता खऱ्या पैलवानासारखे मैदानात उतरून कुस्ती करावी, असे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

Updated : 15 March 2022 2:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top