Home > News Update > अमेरिकेच्या संसद इमारतीत मोठा हिंसाचार, एकाचा मृत्यू

अमेरिकेच्या संसद इमारतीत मोठा हिंसाचार, एकाचा मृत्यू

अमेरिकेत मोठा हिंसाचार, ट्रम्प समर्थकांना पराभव पचेना... एकाचा मृत्यू काय आहे सर्व प्रकरण वाचा...

अमेरिकेच्या संसद इमारतीत मोठा हिंसाचार, एकाचा मृत्यू
X

Courtesy: Social Media

अमेरिकेचे मावळते अध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापपर्यंत पराभव स्विकारत नसल्याचं चित्र कायम असताना ट्रम्प समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातला आहे. या गोंधळामुळे संसदेचं कामकाज थांबवावं लागलं आहे.

गेल्या वर्षी झालेल्या निवडणूकीत ट्रम्प यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर आज संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये येऊन गोंधळ घातल्यानं ही घोषणा करता आली नाही. त्यातच या गोंधळाने संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलं. यावेळी ट्रम्प समर्थकांनी पोलिसांशी देखील झटापट केली. यामध्ये एका व्यक्तीचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. साधारण 4 ते 5 तास हा गोंधळ सुरू होता. पोलिसांनी आता या सर्व गोंधळावर नियंत्रण मिळवलं असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटर आणि फेसबूक ने देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. कॅपिटॉल इमारतीत गोंधळ सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीबाबत निराधार आरोप करत होते. त्यानंतर ट्विटर आणि फेसबूक ने ट्रम्प यांचं ट्विटर अकांउट 12 तासासाठी आणि फेसबूक 24 तासासाठी ब्लॉक केलं आहे. तसंच नागरी अखंडत्त्वाबाबतचे तीन ट्विट डीलिट न केल्यास त्यांचं ट्विटर अकाउंट कायमचं बंद करण्यात येईल. असा इशारा ट्विटर ने दिला आहे.

दरम्यान या संदर्भात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी ट्विट केलं असून... "कॅपिटॉल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न मानणाऱ्यांची ही छोटी संख्या आहे…हा देशद्रोहाचा मार्ग आहे आणि तो थांबला पाहिजे" अशा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.


Updated : 7 Jan 2021 4:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top