Home > News Update > धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा, नागरिकांची मागणी....

धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा, नागरिकांची मागणी....

धीरूभाई अंबानी हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोव्हीड सेंटर बनवा, नागरिकांची मागणी....
X

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मृतांचा आकडासुद्धा वाढतो आहे. परिणामी वाढती रुग्णसंख्या व सध्याची परिस्थिती पाहता रुग्णांना खालापूर तालुक्यात जलदगतीने आणि अत्यावश्यक उपचार मिळत नाहीत‌, अशी नागरिकांची तक्रार आहे.

तालुक्यातील रुग्णांना अतिरिक्त पैसे भरून उपचारासाठी मुंबई-पुणे या ठिकाणी यावे लागत आहे. बऱ्याच रुग्णांना बेडदेखील उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी आणि तसेच पैसे आणि त्रास वाचावा यासाठी लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेऊन तेथे नागरिकांसाठी सुसज्ज कोविड केअर सेंटर हॉस्पिटल उभारावे, अशी मागणी खालापूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

लोधीवली येथे अंबानी ग्रुपचे धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल सुसज्ज व मोठे असून राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर आहे. सद्यस्थितीत खालापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. सध्या या हॉस्पिटलमध्ये रिलायन्स कंपनीचे काही कामगार उपचार घेत असल्याचे समजते. यात बऱ्याचशा कोरोना रुग्णांवर उपचारही होत असल्याचे समजते. शिवाय अनेक कोरोना रुग्ण बरे होऊन कामावर रुजू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

रसायनी-मोहोपाडा, चौक परिसर, खालापूर, खोपोली व औद्योगिक क्षेत्रात रूग्णांची संख्या वाढत आहे आणि येथील रुग्ण त्यांच्या परिस्थितीनुसार मुंबई,नवी मुंबई,पनवेल येथे दाखल होत आहेत. तर काहींची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ते त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे . पण सद्यस्थितीत सर्वच रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जागा नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच ब-याच रुग्णांचे उपचाराअभावी जीव जात आहे.

तर काही रुग्ण घरीच उपचार घेताना आढळतात. खालापूर तालुक्यात सुसज्ज असे शासकीय व खाजगी रुग्णालय नाही. यासाठी मुंबई पुणे जुन्या महामार्गांवर लोधिवली येथे धीरूभाई अंबानी रुग्णालय आहे. या हॉस्पिटलचे रूपांतर कोविड-१९ मध्ये केल्यास तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळेल. शिवाय अनेक रुग्णांचे प्राणही वाचतील, यासाठी प्रशासनाने तसेच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन आवाज उठविण्याची गरज आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता खालापूर तालुक्यातील नागरिकांसाठी लोधिवली येथील धिरुभाई अंबानी हॉस्पिटल फक्त कंपनी कामगारांसाठी बांधिल न ठेवता सर्व नागरिकांसाठी कोविड -19 रुग्णालय म्हणून सुरू करावे अशी मागणी होत आहे. यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

अंबानी रुग्णालय कोव्हिड रुग्णांचे निवारा केंद्र बनले आहे. मात्र सेंट्रल ऑक्सिजन युनिट असून ते गंभीर रुग्णांसाठी का वापरत नाहीत असा सवाल विचारात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही दिले आहे. जोशी यांच्या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हा शल्य चिकित्सक यांना अंबानी रुग्णालयाची पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या रुग्णालयात रुग्णांसाठी 30 आय सी यु बेड निर्माण करणारी यंत्रणा उभी राहत असल्याचे यावेळी समोर आले.

यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने यांच्याशी संपर्क साधला तेव्हा, " धीरूभाई अंबानी रुग्णालयात असलेली सेंट्रल ऑक्सिजन लाईन जुनी आहे. त्यामुळे त्याठिकाणी नवीन लाईन बसवणे गरजेचे आहे, याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या रुग्णालयात गंभीर कोरोना रुग्णाला तातडीने उपचार देण्यात यावेत यासंदर्भात योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला आहे" असे डॉ.माने यांनी सांगितले. आता कोरोना रुग्णांना अंबानी रुग्णालयात उपचार मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

[pdf-embedder url="http://www.maxmaharashtra.com/wp-content/uploads/2020/09/अंबानी-हॉस्पीटल-येथील-कोव्हीड-येथील-सेंटरबाबत-पत्र-1-2.pdf" title="अंबानी हॉस्पीटल येथील कोव्हीड येथील सेंटरबाबत पत्र-1 (2)"]

Updated : 28 Sep 2020 7:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top