Home > News Update > "पटत नसेल तर पुस्तक वाचू नका", सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी कोर्टाने फेटाळली

"पटत नसेल तर पुस्तक वाचू नका", सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी कोर्टाने फेटाळली

पटत नसेल तर पुस्तक वाचू नका, सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदीची मागणी कोर्टाने फेटाळली
X

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. लोकांना पुस्तक आवडत नसेल तर ते खरेदी न करणे हा पर्याय आहे, असे म्हणत न्या. यशवंत वर्मा यांनी पुस्तकाच्या प्रकाशन, विक्री आणि खरेदीवरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. दिल्लीतील एक वकील विनित जिंदाल यांनी ही याचिका केली होती. सलमान खुर्शिद यांचे 'Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times' हे पुस्तक सध्या वादात आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदू धर्माची तुलना ISIS आणि बोको हराम सारख्या अतिरेकी संघटनांशी केल्याचा आक्षेप घेत यावर बंदीची मागणी करण्यात आली होती.

"लेखकाच्या मताशी तुम्ही सहमत नसाल तर ते वाचू नका, पुस्तक वाईट पद्धतीने लिहिले आहे, त्यापेक्षा चांगले काही तरी वाचा, असे देखील कृपया लोकांना सांगा" असे न्या. वर्मा यांनी यावेळी सांगितले. या पुस्तकामुळे देशभरात जातीय तणाव निर्माण होऊ शकतो, अशी भीती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी व्यक्त केली आणि तशा काही घटनाही घडल्या आहेत, असा युक्तीवादही केला. एवढेच नाही तर लेख खुर्शिद यांच्या घरावर देखील हल्ला झाल्याचे वकिलांनी यावेळी नमूद केले. पण कोर्टाने त्यांचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिल्यानंतर किमान पुस्तकातील वादग्रस्त उतारा काढावा, जातीय दंगली अशाच कारणांमुळे घडतात, त्यामुळे किमान नोटीस तरी बजावा अशी विनंतीही वकिलांनी केली. पण निर्बंध कोर्टाने नाही तर सरकारने घालायचे असतात, पण या प्रकरणात सरकारने काहीही केलेले नाही, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले. लोकांना वाईट वाटत असेल तर त्याला कोर्ट काही करु शकत नाही, असे कोर्टाने सुनावले. लोकांना तो विशिष्ट उतारा आवडत नसेल त्यांनी सोडून द्यावा, तरीही त्यांना वाईट वाटत असेल त्यांनी आपले डोळे मिटून घ्यावे, असेही कोर्टाने यावेळी म्हटले आहे.

Updated : 25 Nov 2021 9:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top