स्लॅब कोसळून ज्येष्ठ दांपत्याचा मृत्यू
X
मुंबईत छाया इमारतीच्या घरातला स्लॅब कोसळून एका ज्येष्ठ दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यांनी जखमींना रूग्णालयात दाखल केलं परंतू ते मृत असल्याची घोषणा डॉक्टरांनी केली.
मुंबईत दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढतच चालली आहे. मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोठी छाया या धोकादायक इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन वरिष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्यास होती. ग्राउंड प्लस टू असं या इमारतीचे स्ट्रक्चर होतं. रात्री नऊच्या सुमारास या इमारतीत राहणाऱ्या देवशंकर शुक्ला ९३ वर्षे आणि आरती शुक्ला ८७ वर्षे या दांपत्याचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक तसेच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि या जखमींना जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. महत्त्वाचं म्हणजे ही इमारत पालिका प्रशासनाकडून आधीच धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरी देखील काही कुटुंब या इमारतीमध्ये वास्तव्यास होती. पण आता या इमारतीतील उर्वरीत सर्वांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.






