Home > News Update > MaxMaharashtra Impact : अखेर बीडच्या 'त्या' आरोपींवर गुन्हा दाखल

MaxMaharashtra Impact : अखेर बीडच्या 'त्या' आरोपींवर गुन्हा दाखल

राज्यात एकामागून एक जातीयवादाच्या घटना समोर येत आहेत. त्यातच बीड जिल्ह्यात अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीसाठी जाणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींची नावं सांगितल्याशिवाय तक्रार घेता येत नसल्याचे पोलिसांनी सांगिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपगार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MaxMaharashtra Impact :  अखेर बीडच्या त्या आरोपींवर गुन्हा दाखल
X

राज्यात एकामागून एक जातीय अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. त्यातच धुळे जिल्ह्यातील दलित कुटूंबाने बैलपोळ्यासाठी बैल आणल्याने त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या तरुणांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी गेलेल्या तरुणांची तक्रार पोलिसांनी घेतली नव्हती. परंतू मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात जातीय अत्याचाराच्या घटना एका मागून एक पुढे येत आहेत. धुळे जिल्ह्यातील दलित कुटुंबांवर सामुहिक बहिष्काराचे प्रकरण होते न होते तोपर्यंत बीड जिल्ह्यातील दलित अत्याचाराचे नवे प्रकरण समोर आलेले आहे. अमोल दिवटे यांच्यासह इतर तरुणांनी त्यांना मोरवाडी येथील गावातील मारुती मंदिरात डांबून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पीडित तरुणाचे भाऊ अमोल दिवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील सांगवी या गावातील सागर सदाशिव दिवटे, सचिन दशरथ दिवटे, दत्ता संजय साबळे हे तरुण रोजगारासाठी अहमदनगर जिल्ह्यात राहतात. पण हे सगळे त्यांचे मूळ गावी सांगवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते.

पीडित तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, जातांना त्यांनी त्यांच्या बाईकवर पिवळे झेंडे लावलेले होते. त्यांचे गाव काही अंतरावर राहिलेले असताना ते मोरवाडी फाटा येथे लघवीसाठी थांबले. त्यावेळी तेथे उपस्थित काही तरुणांनी त्यांना तेथे लघवी करण्यापासून हटकले. त्यातील एकाने गाडीवर लावलेला झेंडा पाहून त्यांना जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप पीडित तरुणांनी केला आहे. याला आक्षेप घेतल्यानंतर त्या तरुणांनी आमच्याच गाडीचा झेंडा काढून मारहाण करायला सुरवात केली, असा आरोप अमोल दिवटे यांचे भाऊ सागर यांनी केला आहे. मारहाण झाल्यानंतर त्यांनी अमोल दिवटे यांना फोन केला. अमोल दिवटे सांगतात " मी जयंतीच्या कार्यक्रमात नारळ फोडत होतो. आमची मिरवणूक निघणार होती. ते काम तसेच ठेवून मी तिकडे निघालो. गावात पोहोचताच त्यांनी आमच्यावर दगडफेक सुरु केली. दगडफेक झाल्यावर आम्ही तेथून आम्ही पळालो. आमच्यातील एकजण तेथेच राहिला. त्यांनी त्या दोघांना पकडून मारहाण करत मंदिरात डांबून ठेवले". ज्यांना मारहाण झाली ते विनोद दिवटे सांगतात "आमच्यावर दगडफेक सुरु केली. मी गाडीवरून उतरून माळाच्या दिशेने पळालो. बाकीचे गाडीवरून गेले. मी त्यांना सापडलो. आम्हाला मारहाण केली. गाडीवर बसवले व मोरवाडीत नेले. तेथे नेऊन मारुतीच्या मंदिरात नेऊन कोंडले. कुणीही यायचं आणि हाणायचं. त्यातील एक माणूस म्हणाला मरतेल. एक मरायला लागलाय. त्यांनी बाहेरून कुलूप लाऊन घेतले. तेंव्हा आमचा मार थांबला." निघून गेलेल्या लोकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर कडा पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळावर आले. त्यांनी या दोघांना सोडवून दवाखान्यात आले.

ही धक्कादायक घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही सदर आरोपींवर गुन्हा दाखला करण्यात आला नव्हता. याबाबत सांगावी येथील पीडित लोकांशी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोपागर यांनी संपर्क केला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या लोकांनाच दमदाटी केल्याचा आरोप या लोकांनी केला.

मारहाण केलेल्या व्यक्तींची नावे सांगितल्याशिवाय गुन्हा नोंद करता येत नाही असे त्यांनी सांगितल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. यानंतर मॅक्स महाराष्ट्राने येथील पोलीस उपनिरीक्षक चाऊस यांना फोन केला. त्यांनी या प्रकरणाबाबत विचारताच माझी कॉन्फरन्स सुरु आहे नंतर फोन करून माहिती देतो असे सांगितले. यानंतर या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे यांना आम्ही फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

मारहाणीच्या घटनेला 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. याऊलट पोलिसांनी फिर्यादींनाच दमदाटी केल्याचा आरोप पीडितांनी केला. मात्र त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने केलेल्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

यामध्ये ज्या तरुणांना मारहाण झालेली आहे. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी पोलिसांना कळवूनही पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई का केली नव्हती ? तातडीने गुन्हा दाखल का केला नव्हता ? पोलीस नेमके कशाची वाट पाहत होते? असे प्रश्न निर्माण होत आहेत. मारहाण झालेल्यांची नावे दिल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नाही असे पोलीस निरीक्षक काळे म्हणत असल्याचा आरोप या पीडितांनी केला आहे. याबाबत पोलिसांचे व्हिडीओ चित्रीकरण असल्याचेही म्हटले आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास ऊशीर केल्याने पोलिसांवर कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


मॅक्स महाराष्ट्रने या घटनेवर प्रकाश टाकल्याचे वृत्त- https://www.maxmaharashtra.com/news-update/dalit-youth-being-beaten-by-few-villagers-in-beed-district-serious-allegation-on-police-1163724

Updated : 1 Sep 2022 2:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top