Home > News Update > गुगलच्या ऑफिसमध्ये जातीयवाद?; जातीप्रश्नावरील कार्यक्रम रद्द केल्याने गंभीर आरोप

गुगलच्या ऑफिसमध्ये जातीयवाद?; जातीप्रश्नावरील कार्यक्रम रद्द केल्याने गंभीर आरोप

गुगलच्या ऑफिसमध्ये जातीयवाद?; जातीप्रश्नावरील कार्यक्रम रद्द केल्याने गंभीर आरोप
X

गुगलच्या (google) मुख्य कार्यालयात होऊ घातलेला कार्यक्रम रद्द झाल्यानंतर दलित संघटनेनं काही गंभीर आरोप केले आहेत. गुगलच्या कार्यालयात जातीय समानता नसल्याचं, जातीयवादाला खतपाणी घातलं जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

माहीती तंत्रज्ञानातील (IT)सर्च इंजिन क्षेत्रातील मातब्बर कंपनी असलेल्या गुगलवर एका दलित संघटनेनं गंभीर आरोप केले आहेत. गुगल जातीयवादी असल्याचा आरोप कॅलिफोर्नियातील दलित हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यानं केले आहे. गुगलकडून जातीयवादाला खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

गुगलनं आपल्या कार्यालयात एप्रिलमध्ये 'जातीची समस्या' या विषयावर कार्यकर्ता थेममोझी सौंदराराजन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. थेममोझी सौंदराराजन कॅलिफोर्नियातील इक्विलिटी लॅब्सच्या संस्थापिका आणि कार्यकारी संचालिका आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या विरोधामुळे गुगलनं सौंदराराजन यांचा कार्यक्रम रद्द केल्याचं बोललं जात आहे.

काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, गुगलच्या काही कर्मचाऱ्यांनी सौंदराराजन हिंदूविरोधी आणि हिंदूफोबिक असल्याच्या अफवा पसरवल्या. सौंदराराजन यांचा कार्यक्रम गुगलकडून रद्द करण्यात आल्यानंतर सौंदराराजन आणि इक्विटी लॅब्सकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. 'जातीय समानतेच्या विरोधात असलेल्यांनी नागरी हक्कांशी संबंधित कार्यक्रम रद्द व्हावा यासाठी सौंदराराजन आणि इक्विटी लॅब्सबद्दल चुकीची माहिती पसरवली', असा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणानंतर गुगल न्यूजच्या वरिष्ठ व्यवस्थापिका तनुजा गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. गुप्ता यांनीच सौंदराराजन यांना गुगलच्या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं होतं. मात्र हा कार्यक्रमच रद्द झाल्यानं गुप्ता यांनी राजीनामा दिला. 'गेल्या ११ वर्षांत कंपनी सोडण्यासाठी अनेक कारणं मला मिळाली. मात्र हेच कारण माझ्यासाठी गरजेचं होतं. कंपनीत जातीय समानता वाढवताना चार महिलांना त्यांच्या वर्णामुळे त्रास सहन करावा लागला. त्यांना गप्प केलं गेलं,' असं गुप्ता यांनी म्हटलं.

गुगलच्या प्रवक्त्या शॅनन न्युबेरी यांनी एका पत्रक प्रसिद्ध करून कंपनीवरील सगळे आरोप फेटाळले आहेत. 'जातीय भेदभावाला आमच्या कार्यालयात कोणतंही स्थान नाही. बदला आणि भेदभावाविरोधात आमच्या कार्यालयात अतिशय स्पष्ट धोरण आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना एकत्रित आणण्याऐवजी भेदाभेद आणि द्वेष निर्माण करणारा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला,' अशा शब्दांमध्ये न्युबेरी यांनी गुगलची बाजू मांडली आहे.

Updated : 5 Jun 2022 9:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top