Home > News Update > दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआयची UAPA अंतर्गत 5 आरोपींवर खटला चालवण्याची मागणी

दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआयची UAPA अंतर्गत 5 आरोपींवर खटला चालवण्याची मागणी

दाभोलकर हत्या प्रकरण: सीबीआयची UAPA अंतर्गत 5 आरोपींवर खटला चालवण्याची मागणी
X

सीबीआयने न्यायालयात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 2013 च्या खून प्रकरणात आरोपींविरोधात युएपीए अंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली आहे.

वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (3 सप्टेंबर) ला सुनावणी पार पडली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालयाचे न्यायाधीश) एस आर नावंदर यांच्यासमोर झालेल्या या सुनावणीत सीबीआयने युएपीए अंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली.

विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सीबीआयच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपींवर कलम 120 ब (गुन्हेगारी कट), 302 (खून), शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि यूएपीए च्या कलम 16 (दहशतवादाच्या कृत्यांसाठी शिक्षा) अंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली.

दरम्यान सरकारी वकिलाने यावेळी यूएपीएचे कलम 16 लागू करण्यासाठी राज्य सरकारकडून सीबीआयला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. मात्र, बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी UAPA चे कलम 16 लागू करण्याच्या फिर्यादीच्या मागणीला विरोध केला होता.

'दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 7 सप्टेंबरची तारीख दिली आहे'.

महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धेच्या विरोधात प्रचार करणारे डॉ नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ते मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणी आठ जणांना अटक केली असून त्यापैकी पाच जणांविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले आहे.

या प्रकरणात, सीबीआयने 2016 मध्ये सनातन संस्थेचे सदस्य डॉ. वीरेंद्र तावडे, ईएनटी सर्जन आणि कथित मुख्य षड्यंत्रकार यांना अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये, दाभोलकरांवर कथितपणे गोळीबार करणाऱ्या शरद कळसकर आणि सचिन प्रकाशराव अंदुरे या दोन नेमबाजांना अटक करण्यात आली. मे 2019 मध्ये सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना मुंबईत अटक करण्यात आली. या पाच जणांविरुद्धच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील संजीव पुनाळेकर सध्या जामिनावर बाहेर असून इतर चार जण तुरुंगात आहेत

सीबीआयने अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांना अटक केली आहे. जे 2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे आरोपी आहेत. या तिघांविरुद्ध आजपर्यंत आरोपपत्र दाखल झालेले नाही.

Updated : 5 Sep 2021 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top