Home > News Update > नाशिक नोटा छापखान्यामधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब, मोठा घोटाळ्याची शक्यता?

नाशिक नोटा छापखान्यामधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब, मोठा घोटाळ्याची शक्यता?

नाशिक नोटा छापखान्यामधून 5 लाख रुपयांच्या नोटा गायब, मोठा घोटाळ्याची शक्यता?
X

नाशिक येथील करन्सी नोट प्रेस मधून ५०० रुपयांच्या १०० नोटांचे १० बंडल कोऱ्या करकरीत नोटा म्हणजेच ५ लाख रुपये असलेले एक पाकिट गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे प्रेस चं काम दोन महिने बंद होते. प्रेस व्यवस्थापनाने नाशिक उपनगर पोलीस स्टेशनला धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला .

नोटा छापखाना कारखान्यात अभेद्य सुरक्षा कवच असताना नोटा गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळं तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची आठवण होत असून पुन्हा एका घोटाळ्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याची चर्चा आहे.

नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये ५०० व २०० रुपयांच्या नोटा सह सर्व छोट्या नोटांची छपाई केली जाते. या प्रेस मधून ५०० व २०० रुपयांच्या छापलेल्या नोटाचे कागद गेल्या आठवड्यात गायब झाल्याचं बोललं जातंय, करन्सी नोट प्रेस मध्ये ज्या ठिकाणी छपाई होते. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कुठेच उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून याबाबत गोपनीय चौकशी सुरु असून दोषी कोण?, कोणी या नोटा गायब केल्या त्याचबरोबर कुठल्या युनिट मधून हे पैसे गायब करण्यात आले. या बद्दलची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. एका युनिटमध्ये अडीचशे ते तीनशे कर्मचारी काम करत असल्यामुळे कोणत्या शिफ्ट मधून कोणत्या वेळेस हे पैसे गायब झाले. याचा शोध आता पोलीस घेणार आहेत.

नोटा छापल्यानंतर बॉक्‍समध्ये पॅकिंग करून रिझर्व बँकेला ते पाठवण्यात येतात. त्यावेळी नोटा मोजणी करताना हा सर्व प्रकार उघडकीस आला. प्रथम दर्शनी ५ लाख रुपये गायब झाल्याचे समोर आले असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सिक्युरिटी प्रेसला CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्यूरिटी फोर्सची सुरक्षा आहे, असे असताना इतकी मोठी रक्कम गायब झालीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर CISF सतर्क झाली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांची चेकिंग न करता ये जा सुरु असे किंवा काही विशिष्ट नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या मधून पूर्णपणे सुट दिली जात असे. मात्र, आता प्रत्येक कर्मचाऱ्यांची कसोशीने तपासणी करण्यात येते. प्रत्येकाला आयकार्ड बंधनकारक करण्यात आले. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवणे आणि वापराची सुविधा काढून घेण्यात आली आहे.

सुरुवातीला व्यवस्थापनाने गायब झालेल्या नोटांची गोपनीय चौकशी करीत दोषी कर्मचाऱ्यांचा शोध घेतला हाती काहीच आलं नाही. अखेर पोलिसात तक्रार दाखल करावी लागली. सदर तक्रार दाखल करण्यास विलंब का झाला असा प्रश्न ही उपस्थित होत आहे. सदर नोटा वाहतूक करताना गायब झाले का? की प्रेस मधूनच गायब झाले? नोटा मोजण्यात मॅचिंग होत नाही? या घटनेबाबत RBI कोणती कार्यवाही करणार? या पूर्वी पण असा प्रकार झालाय का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

तब्बल 5 लाख रुपयांचा हिशोब लागत नसल्याने ही चोरी आहे की अपहार याबाबत चौकशी सुरू झाली आहे.. अत्यंत गंभीर प्रकरण असल्याने याबाबत बोलण्यास नोट प्रेस प्रशासकीय अधिकारी किंवा युनियन लीडर देखील तयार नाहीत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून 5 लाखांचा हिशोब लागत नव्हता. पण प्रकरण दडपून ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने अखेर नोट प्रेसच्या अधिकाऱ्यांना याबाबत पोलीस स्टेशन गाठावे लागलं अशी चर्चा आहे.

पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया-

नाशिक पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितलं की, या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांत ठाण्यात 500 रुपयांचे 10 तयार बंडल, असे 5 लाख रुपये गहाळ झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 फेब्रुवारीपासून हे बंडल गहाळ झाले होते. अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान करन्सी नोट प्रेस प्रशासनाने अंतर्गत चौकशी अहवाल पोलिसांना सुपूर्द केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या तपासादरम्यान करन्सी नोट प्रेस मधील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जातील. असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Updated : 14 July 2021 6:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top