Home > News Update > राजकारण आपलं होतं.. जीव जनतेचा जातो: मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

राजकारण आपलं होतं.. जीव जनतेचा जातो: मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार सर्वांनीच करायला हवा. अगदी आम्ही राजकारण्यांनीही, राजकारण आपल्या सर्वांचं होतं पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी आज विरोधकांना फटकारले आहे.

राजकारण आपलं होतं.. जीव जनतेचा जातो: मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
X

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या "माझा डॉक्टर" या ऑनलाईन परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.कार्यक्रमालाआरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य सर्वश्री, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभु, अमेरिकेतील डॉ. मेहूल मेहता, यांच्यासह राज्यभरातील डॉक्टर्स, नागरिक आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जगभरातील देशात तिसऱ्या लाटेचा अनुभव कटु आहे. आकडे ही स्थिती स्पष्ट करतात. जर तिसरी लाट अपरिहार्य असेल, ती येऊ नये अशी आपली प्रार्थना आहे. पण प्रार्थनेच्या पुढे एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे अस मला वाटत. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असं आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत, त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसऱ्या लाटेची शक्यता सांगितली जात आहे मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे त्यासाठी आपण ही सज्‍ज राहिले पाहिजे असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.लाट ऊंचीवर पोहोचली की श्वास घ्यायला उसंत मिळत नाही. यावेळी आपल्या यंत्रसामग्रीचा वापर वाढतो. ऑक्सीजन असो की रुग्णशय्या, व्हेंटिलेटर्स असो की अन्य इलेक्ट्रिक यंत्रसामग्री या सगळ्याच गोष्टी सतत वापरात असल्याने त्यांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सगळ्या रुग्णालयांनी या गोष्टीचे ऑडिट करून घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कोरोनानं काय शिकवले?

शिक्षण दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षक कुठे, कधी कसा भेटेल हे सांगता येत नाही. कोरोनाने आपल्याला काय शिकवलं हे मागे वळून पाहण्याची गरज. रस्ता क्रॉस करतांना आपण मागे-पुढे वळून पहातो, रहदारीची काळजी घेतो. तसेच आता आपल्याला कोरोनाचे संकट क्रॉस करून पुढे जायचे आहे.

आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेरच पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेण्याची गरज.

ऑक्सीजन तुटवडा :

महाराष्ट्राने ज्या वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केली तेवढी क्वचितच एखाद्या देशाने केली असावी. पण आजही ऑक्सीजनची आपल्याकडे कमी आहे आपण रोज ३ हजार मे.टन ऑक्सीजन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. काही यंत्रसामग्री बाहेरून आणावी लागत आहे, त्यात काही वेळ जाणार आहे असे त्यांनी स्पष्ट केलं.

आपण आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ केली आहे. आज आपल्याकडे १.२५ लाख ऑक्सीजन बेडची उपलब्धता आहे. पण ऑक्सीजन बेड वाढवले म्हणजे आपण या सगळ्या रुग्णांना ऑक्सीजन देऊ शकतो का याचा विचार करायला हवा. मागच्यावेळी ८० हजार रुग्णांना ऑक्सीजन देण्याची गरज होती. पण त्यांना पुरेल एवढा ऑक्सीजन आपल्याकडे नव्हता.

आपले ऑक्सीजनचे उत्पादन तेंव्हा रोज १२०० ते १३०० मे.टन एवढेच होते. त्यावेळी १७०० ते १८०० मे.टन ऑक्सीजनची गरज लागली. इतर राज्यातून हजारो कि.मी हून ऑक्सीजन आणावा लागला. आपली यंत्रणा श्वास रोखून बसली होती. इतर राज्यातून आपण ऑक्सीजनची गरज भागवली. पण त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला त्या राज्यातून ऑक्सीजन मिळत नाही, तो ऑक्सीजन ते राज्य त्यांच्या राज्यातील रुग्णांसाठी वापरतात ही वस्तुस्थिती आहे अशावेळी आपल्या ऑक्सीजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे.

आज १४०० मे.टन ऑक्सीजनचे उत्पादन राज्यात होत आहे. त्यात स्टील आणि लघु उद्योगासाठी ऑक्सीजन वापरतात. औषधक्षेत्रात, लस तयार करण्यासाठी ऑक्सीजनची गरज असते. मागच्यावेळी सर्वच आपण ऑक्सीजन मेडिकल कारणासाठी वापरला म्हणजे इतर गोष्टींसाठी लागणारा ऑक्सीजन आपण बंद केला. आजही 1400 मे.टन ऑक्सीजनपैकी ३०० ते ३५० ऑक्सीजन आपण रुग्णांसाठी वापरत आहोत. इतर राज्यातून ऑक्सीजन आणण्याची वेळ येऊ नये हा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

लसीचे दोन्ही डोस घ्या. पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी, चारचौघात वावरतांना काळजी घ्या, मास्क नक्की लावा. माझा डॉक्टरांनीही आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना यासंबंधी सांगून जनजागृती करावी.कोरोनामुक्त गावाची संकल्पना शासनाने राबविली. मला खुप अभिमान आहे की महाराष्ट्रातील अनेक गावांनी यात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त केले.माझे- कुटुंब माझी जबाबदारी ही जशी महत्वाची गोष्ट आहे तशीच माझे गाव माझी जबाबदारी ही गोष्ट ही महत्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन गाव कोरोनामुक्त करावे असे आवाहन त्यांनी केलं.

आता सणवाराचे दिवस सुरु आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढतांना दिसत आहे त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

विषाणुचा रोज नवा अवतार येत आहे आणि जगाला ग्रासून टाकत आहे. वाहतूकीतून कोरोनाचा प्रवास होत आहे.आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटी केलं.

Updated : 5 Sep 2021 8:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top