Home > News Update > लसीकरणास पुन्हा सुरवात... सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार लसीकरण...

लसीकरणास पुन्हा सुरवात... सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार लसीकरण...

कोविन अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यात आल्या असून आज पासून लसीकरणास पुन्हा सुरवात करण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एकाच सत्रात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोविन अँपमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांची गैरसोय झाली होती. त्रुटी दूर होईपर्यंत रविवार व सोमवार असे २ दिवस लसीकरण थांबवण्यात आले होते.

लसीकरणास पुन्हा सुरवात... सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार लसीकरण...
X

देशव्यापी लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीला सुरुवात झाली होती. मात्र केंद्र सरकार कडून लसीकरणाचे नोयोजन करण्यासाठी बनवण्यात आलेल्या कोविन अँपमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने अनेकांची गैरसोय झाली होती. पहिल्या दिवशी तीन लाख कोरोना योध्याना ही लस देणं अपेक्षित होत पण आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार पहिल्या दिवशी फक्त एक लाख पासष्ट हजार सातशे चौदा इतक्या लोकांना लस देण्यात आली.

या अँप मध्ये त्रुटी असल्याने अनेक लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडाला होता. अखेर लाभार्थ्यांना फोन करून बोलाविण्यत आले. त्यामुळे शनिवारी अ‍ॅपचा वापर न करता लसीकरण सुरू करावे लागले होते. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारतर्फे सुरू होते. त्यानंतर या अँप मधील त्रुटी दूर होईपर्यंत रविवार व सोमवार असे २ दिवस लसीकरण थांबवण्यात येत असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

यानंतर या अ‍ॅपमधील त्रुटी दूर करण्यात आल्या असून आज लसीकरणास पुन्हा सुरवात करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. राज्य सरकारच्या माध्यमातून जे.जे. रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार असून जेजेमध्ये दररोज १०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल; केईएम रुग्णालय, परळ; शीव रुग्णालय; कूपर रुग्णालय, विले पार्ले; व्ही. एन. देसाई रुग्णालय, विले पार्ले; वांद्रे भाभा रुग्णालय; डॉ. आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली; राजावाडी रुग्णालय, घाटकोपर; बीकेसी कोविड सेंटरवर एकूण ४० केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एकाच सत्रात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Updated : 19 Jan 2021 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top