Home > News Update > करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी सोमवारी

करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी सोमवारी

करुणा शर्मा यांना दिलासा नाहीच, पुढील सुनावणी सोमवारी
X

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना शनिवारीही दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या जामिनीवरील निर्णय सोमवारपर्यंत पुढे गेला आहे, त्यामुळे त्यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

न्यायाधीश सापटनेकर यांच्यासमोर शनिवारी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. न्यायालय यावर सोमवारी निर्णय देणार आहे. शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी त्यांना ५ सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर ६ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्या. सापटनेकर यांच्यासमोर शर्मा यांच्या जामिनावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अँड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी बाजु मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सोमवारी निर्णय देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे करुणा शर्मांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

Updated : 18 Sep 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top