Home > News Update > लॉकडाऊनमुळे चप्पलवर शस्त्रक्रिया करणारी 'रापी' थांबली

लॉकडाऊनमुळे चप्पलवर शस्त्रक्रिया करणारी 'रापी' थांबली

लॉकडाऊनमुळे चप्पलवर शस्त्रक्रिया करणारी रापी थांबली
X

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात आता आरोग्य यंत्रणाही हतबल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारने 'ब्रेक दि चैन' अंतर्गत अनेक निर्बंध लावले आहे,आणि याचाच फटका छोट्या. मोठ्या व्यावसायिकांना बसत आहे. याचप्रमाणे हातावर पोट भागवणारे चर्मकार बांधवांचा व्यवसायही बंद पडला आहे.

औरंगाबाद शहरातील समता नगरमध्ये राहणारे 65 वर्षीय तुळशीराम येटोरे वयाच्या पंधराव्या वर्षापासून रस्त्यावर दुकान थाटून तुटलेल्या चपला आणि बुटपॉलिशसाठी ग्राहकांची वाट पाहतात. मग हिवाळा-पावसाळा असो किंवा उन्हाळा,पहाटेचा सूर्य डोक्‍यावर आल्यापासून तर सूर्यास्तापर्यंत सावलीच्या आडोश्याला आपलं दुकान लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एवढ्या वर्षात त्यांना कधीच 'विकली अप' समजलाच नाही.

यापूर्वी मिळेल तिथं दुकान थाटायच आणि अतिक्रमण विभागाचे लोकं आले की जागा बदलायचं असं येटोरे यांच नेहमीचा प्रवास झाला होता. मात्र 2007 मध्ये त्यांनी शहरातील क्रांती चौकाच्या एका कोपऱ्यात आपली दुकान थाटली आणि तेव्हापासून आजपर्यंत ते तिथंच बसून आहे.

दोन मुलं आणि बायोको असं येटोरे यांचा कुटुंब आहे. मात्र उभ्या आयुष्यात चार पत्र्याचा घर सुद्धा त्यांना करता आलं नाही. त्यामुळे दोन्ही मुलांनी वेगळा संसार थाटत मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवण्याचा निर्णय घेतला.

स्वतःच घर नसल्याने येटोरे समता नगरमध्ये 3 हजार रुपयांच्या भाडेतत्त्वावर घर घेऊन आपल्या बायकोसोबत राहतात. बायको दिवसभर लोकांच्या घरांची धुणीभांडी करून काही पैसे जमा करते तर लोकांच्या चपला-बूट शिवून दिवसांतून शंभर-दोनशे कमवून येटोरे दाम्पत्य आपल्या आयुष्याचा गाडा हाकलत आहे.

कोरोनाने सगळंच संपवलं..!

गेल्यावर्षी कोरोना आल्यानंतर व्यवसायावर परिणाम झाला होता, मात्र त्यावेळी बायकोच्या कामाच्या पैश्याने घर खर्च चालत होता. पण आता दुसऱ्या लाटेत सगळंच संपल्या सारखं वाटत आहे. बायको काम करत असलेल्या घरमालकांनी कोरोनामुळे कामावरून काढून टाकले.दुसऱ्या ठिकाणीही कुणीही काम द्यायला तयार नाही.त्यामुळे आता तो आर्थिक मार्ग बंद झाला आहे.

त्यात लॉकडाऊनमुळे लोकं घराबाहेर पडत नसल्याने चपला आणि बुटपॉलिशचा धंदा जवळपास ठप्पच झाला आहे. यापूर्वी कसेही दोनशे रुपये तरी दिवसातून येत होते. मात्र आता तर कधीकधी दिवसभर बसूनही हातात फक्त 30 रुपये येतात. त्यामुळे घर चालवणे अवघड झालं असल्याचं येटोरे म्हणाले.

येटोरे यांच्याप्रमाणेच अनेक चर्मकार बांधवांची परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे सरकारने घोषणा केलेल्या 'लॉकडाऊन पॅकेज' मधून मदत मिळावी अशी मागणी चर्मकार संघटनाकडून होत आहे.

Updated : 17 April 2021 9:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top