Home > News Update > कोरोनामुळे आणखी एक सीरिज रद्द, वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

कोरोनामुळे आणखी एक सीरिज रद्द, वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्यात. आता यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे सीरिज कोरोनामुळे रद्द करण्यात आली

कोरोनामुळे आणखी एक सीरिज रद्द, वेस्ट इंडिज टीम मायदेशी परतणार
X

क्रिकेट विश्वाला जणू कोरोनाचं ग्रहणच लागलंय, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्यात. आता यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील वन-डे सीरिज कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वेस्ट इंडिज टीममध्ये झालेल्या कोरोना ब्लास्टमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता जून 2022 मध्ये ही सीरिज होणार आहे.

वेस्ट इंडिज टीम 21 सदस्यांसह पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. मात्र, बुधवारी झालेल्या शेवटच्या टी 20 साठी वेस्ट इंडिज टीमचे फक्त 14 खेळाडू उपलब्ध होते. या टीममधील 6 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर डेवॉन थॉमस हा खेळाडू पहिल्या टी20 सामन्यात बोटाला दुखापत झाल्याने सीरिजमधून बाहेर झाला आहे. या सर्व संकटात तिसरी टी20 होणार की नाही? याबाबत शासंकता निर्माण झाली होती. पण वेस्ट इंडिज बोर्डाला हा सामना खेळण्यासाठी तयार करण्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला यश आले.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार टीममधील आणखी 5 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विकेट किपर - बॅटर शाही होप , स्पिनर अकिल हुसेल आणि ऑल राऊंडर जस्टीन ग्रेव्हीस हे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्याचबरोबर वेस्ट टीमचे असिस्टंट कोच आणि फिजिशियनलाही कोरोनाची लागण झाली आहे.

यापूर्वी वेस्ट इंडिज टीममधील फास्ट बॉलर शेल्डन कॉट्रेल , ऑल राऊंडर रोस्टन चेज आणि काईल मेयर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच गैर कोचिंग स्टाफमधील एक सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज टीममधील कोरोना संकटामुळेच 18 डिसेंबरपासून सुरू होणारी वन-डे सीरिज स्थगित करण्यात आली आहे.

Updated : 17 Dec 2021 3:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top