राज्यसभेसाठी काँग्रेसकडून राहुल ब्रिगेडच्या ‘या’ नेत्याला संधी?

90

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (congress) राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या ७ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे.

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव (rajiv satav) यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत सातव हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अगदी काठावर निवडून आले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली नव्हती.

राजीव सातव राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे विश्वासू मानले जातात. त्यांचं दिल्लीत चांगलं वजन आहे. याशिवाय गुजरातसह अन्य काही राज्यांच्या निवडणुकांमध्येही त्यांनी काँग्रेससाठी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभेसाठी संधी दिली जाऊ शकते असं बोललं जातंय.

महाविकास आघाडीच्या ४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार (Sharad Pawar) आणि फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार अद्याप घोषित झालेला नाही. भाजपने (BJP) रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यांचा तिसरा उमेदवार आणखी गुलदस्त्यात आहे.