Home > News Update > लसीकरण केंद्रे बंद असताना कसला 'लस महोत्सव' नाना पटोलेंचा मोदींना सवाल

लसीकरण केंद्रे बंद असताना कसला 'लस महोत्सव' नाना पटोलेंचा मोदींना सवाल

लसीकरण केंद्रे बंद असताना कसला लस महोत्सव  नाना पटोलेंचा मोदींना सवाल
X

जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान 'लस महोत्सव' आयोजित करण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असताना अशा परिस्थितीत लसीकरण कसे करायचं असा सवाल आता कॉंग्रेसने केला आहे.

कोरोनाच्या गंभीर संकटात लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा केला जात नाही. लसीअभावी अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ते १४ एप्रिल दरम्यान 'लस महोत्सव' साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे लस पुरवठ्याअभावी बंद असताना 'महोत्सव' कसा होऊ शकतो?

असा सवाल कॉंग्रेसने केला आहे.

या संदर्भात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रसरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले… 


कोरोनाच्या गंभीर संकटातही लसीचे राजकारण करून संकटाला महोत्सव म्हणून साजरे करणा-या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी लसीअभावी बंद असलेल्या राज्यातील लसीकरण केंद्राबाहेर काँग्रेस घंटानाद, थाळीनाद आंदोलन करणार आहे.

संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव प्रचंड वेगाने वाढत आहे. तो रोखण्यासाठी सध्यातरी लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. पण केंद्र सरकारकडून राज्याला पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद करण्यात आले आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला पुरेशी लस पुरवण्याऐवजी पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांना मोफत लस पुरवत आहेत. राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही महाराष्ट्राला मुबलक लसीचा पुरवठा केला जात नाही.

महाराष्ट्रापेक्षा अत्यंत कमी रूग्णसंख्या व लोकसंख्या असलेल्या गुजरातसारख्या भाजपशासीत राज्यांना महाराष्ट्रापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात आहे. कोरोनाने मोठ्या प्रमाणात रूग्णांचा मृत्यू होत असताना केंद्र सरकार लसीच्या वाटपातही राजकारण आणि दुजाभाव करत आहे. हे अत्यंत दुर्देवी व बेजबाबदार आहे. कुठल्याही संकटात जनतेला वा-यावर सोडून संकटाचा सोहळा साजरा करण्याचा रोग भाजपाला जडला आहे.

केंद्र सरकार जाणीवपूर्वक विरोधी पक्षांच्या सरकारची कोंडी करून अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडण्याचे राजकारण करत आहे. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती घोषीत केल्याने या संकटाची सर्व जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. या संकटातून सर्व राज्यांना वेळेवर योग्य त्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांसह इतर मदत देणे केंद्राचे कर्तव्य असताना त्यात कुचराई करून महोत्सवासारखे इव्हेंट करण्यातच मोदी सरकार वेळ घालवत आहे. केंद्रातील मोदी सरकारला परिस्थितीचे गांभिर्य नाही, म्हणूनच लसींचा पुरेसा पुरवठा होऊन लसीकरण सुरळीत होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

Updated : 11 April 2021 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top