Home > News Update > निवडणूक आयोगाची घटनात्मक स्वायत्तता धोक्यात, भाजपवर कठोर टीका - पृथ्वीराज चव्हाण

निवडणूक आयोगाची घटनात्मक स्वायत्तता धोक्यात, भाजपवर कठोर टीका - पृथ्वीराज चव्हाण

निवडणूक आयोगाची घटनात्मक स्वायत्तता धोक्यात, भाजपवर कठोर टीका - पृथ्वीराज चव्हाण
X

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा, नगरपालिका निवडणुकांबाबत गंभीर शंका आणि आक्षेप उपस्थित करत माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, विधानसभा निवडणुकांमध्येही त्याच स्वरूपाचा कौल मिळेल असा विश्वास काँग्रेससह आघाडीतील सर्व पक्षांना होता. मात्र जागावाटपातील अति आत्मविश्वास, अंतर्गत राजकारण आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गंभीर अनियमिततेचा फटका आघाडीला बसला. ते म्हणाले की, हरियाणा व महाराष्ट्राच्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेस घेण्याचा निर्णय हा संशयास्पद असून, यामागे सत्ताधारी भाजपला राजकीय लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न दिसतो. निवडणूक आयोगाची घटनात्मक स्वायत्तता धोक्यात आली असून, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया केंद्र सरकारने बदलल्यामुळे आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी एकत्रितपणे पराभूत उमेदवारांना निवडणूक याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 50 उमेदवारांनी मुदतीत हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. स्वतः चव्हाण यांची याचिका बॉम्बे हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल असून त्यावर सुनावणी सुरू आहे.


60 ते 70 हजार डुप्लिकेट मतदार

आपल्या मतदारसंघातील अनुभव मांडताना त्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर डुप्लिकेट मतदार नोंदणी झालेली आहे. सुमारे 3 लाख 15 हजार मतदारांपैकी जवळपास असख्य ठिकाणी 12 हजार मतदारांची नावे पुनरावृत्त आढळून आली आहेत. शेजारच्या पाच मतदारसंघांचा विचार केल्यास सुमारे 60 ते 70 हजार डुप्लिकेट मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व माहिती काँग्रेस पक्षाने संकलित केली असून, तपासणीसाठी खुली ठेवण्यात आली आहे.


मल्टिपल व्होटिंग मोठ्या प्रमाणावर

ते म्हणाले की, निवडणूक आयोगाकडे आधुनिक सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही डुप्लिकेट मतदार नावे काढण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एकाच व्यक्तीला अनेक ठिकाणी मतदान करण्याची संधी मिळणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. बोटावरील शाई सहज पुसली जाऊ शकते, त्यामुळे मल्टिपल व्होटिंग मोठ्या प्रमाणावर झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


‘लाडकी बहीण’ योजनेमुळे बदल होऊ शकत नाही

चव्हाण यांनी स्पष्ट आरोप केला की, केवळ ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे किंवा काही लोककल्याणकारी निर्णयांमुळे इतका मोठा निवडणूक निकाल बदल होऊ शकत नाही. भाजपचा जवळपास 89 टक्के स्ट्राइक रेट हा असामान्य असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उघडपणे पैशांचा वापर होत असून, काही ठिकाणी मतांची किंमत 8 ते 10 हजार रुपयांपर्यंत गेल्याची माहिती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे लोकशाहीचे अपयश असून, यासाठी निवडणूक आयोगाची मोठी जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, महाराष्ट्रात सुरू असलेल्या आमदारांची खरेदी-विक्री, प्रचंड भ्रष्टाचार आणि निवडणूक व्यवस्थेतील गैरप्रकारांसाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. “एका फोन कॉलवर हे सगळे थांबू शकते, पण जाणीवपूर्वक ते थांबवले जात नाही,” असा आरोप करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित केली. लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी आणि स्थानिक पातळीवर आम्ही सर्वजण लढत राहू, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Updated : 17 Dec 2025 1:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top