पडळकर - खोतांचा 'त्या' पैशात वाटा आहे का? याचा तपास यंत्रणेने करावा - महेश तपासे
X
गेल्या काही महिन्यांपासून आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर (St workers)एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी आंदोलन करत चप्पल आणि दगडफेक केली.एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर टिका केली आहे.
भाजपचे विद्यमान आमदार पडळकर आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या (St workers) आंदोलनाचे नेतृत्व केले होते त्यामुळे सदावर्तेने जमा केलेल्या पैशामध्ये या दोघांचा वाटा आहे का? याचाही तपास यंत्रणेने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
सदावर्ते यांनी कामगारांकडून सुरुवातीला ५३० आणि नंतर ३०० रुपये जमा केले असा युक्तिवाद न्यायालयात झाला आहे. जवळपास ९० हजार कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले असतील तर या पैशांचा आकडा फार मोठा होतो. रोखीत पैसे घेतले असतील तर रोख पैसे घेणे हा इन्कमटॅक्सच्यादृष्टीने गुन्हा आहे असेही महेश तपासे म्हणाले.
महामंडळाचे विलिनीकरण व्हावे याला कोर्टाने मान्यता दिली नाही. त्यामुळे पाच महिने कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले. हे आंदोलन चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न होता आणि याला भाजपने समर्थन दिले होते याकडे महेश तपासे यांनी लक्ष वेधले आहे.






