Home > News Update > अर्णब गोस्वामींचं मानसिक संतुलन बिघडलंय का?

अर्णब गोस्वामींचं मानसिक संतुलन बिघडलंय का?

अर्णब गोस्वामींचं मानसिक संतुलन बिघडलंय का?
X

भडकाऊ भाषा वापरणे, वस्तुस्थितीला अनुसरून रिपोर्टींग न करणे आणि धार्मिक तणाव वाढावा. या हेतूने घेतलेले डिबेट शो या कारणांवरून रिपब्लिक टीव्हीचे एडिटर अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात दिनांक दि ८ मे २०२० रोजी सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलखा यांनी अ‍ॅड.असीम सरोदे यांचा कायदेविषयक सल्ला घेऊन पोलीस आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दि ८ मे २०२० रोजी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार केबल टेलीव्हीजन नेटवर्क (नियमन) कायदा (Cable Televisions Network (Regulation) Act, 1995) च्या अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. त्यासोबतच रिपब्लिक टीव्हीचे व रिपब्लिक भारत ची मालक कंपनी एआरजी आउटलिअर मीडिया एशियानेट न्यूज प्रायव्हेट लिमिटेड च्या व्यवस्थापकीय संचालकांविरोधात सुद्धा तक्रार करण्यात आलेली आहे.

अर्णब गोस्वामी हे रिपब्लिक टीव्ही इंग्लिश आणि रिपब्लिक भारत या हिंदी वाहिनीचे एडिटर आहेत. या वाहिन्यांवर रात्री ९ ते १० त्यांचे ‘पुछता भारत’ इत्यादी डिबेट शो चालतात. अर्णब गोस्वामी यांचे टीव्ही शो अनेक चुकीच्या कारणांसाठी नेहमी चर्चेत राहिले आहेत. या शोमध्ये अर्णब गोस्वामी यांच्याकडून वापरली जाणारी भाषा, त्यांचे हावभाव व अविर्भाव, त्यांची देहबोली एका विशिष्ठ धर्माला आणि काही व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रयत्न करणारी असते. या कारणांवरून अर्णब गोस्वामी व त्यांचे टीव्ही शो यांच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक वेळा आक्षेप घेतले गेलेत, फौजदारी तक्रारी दाखल झाल्यात. पण आता पहिल्यांदाच केबल टेलीव्हीजन नेटवर्क (नियमन) कायदा १९९५ च्या तरतुदींचा वापर करीत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

कोरोना विषाणूमुळे पोलीस लॉकडाऊन च्या अंमलबजावणीमध्ये व्यस्त होते हे समजून घेण्यासारखे असले तरीही आता मात्र पोलिसांनी आमच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करावी. अशी मागणी तक्रारदार निलेश नवलाख यांनी केली आहे.

नुकत्याच झालेल्या पालघर लिंचिंग घटनेवरून अर्णब गोस्वामी यांनी सरकारचे सगळे नियम आणि सूचना धाब्यावर बसवून या संपूर्ण घटनेला धार्मिक रंग देऊन धर्म धर्मात तणाव आणि सामाजिक ऐक्य खराब करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. केवळ पालघर लिंचिंगच नाही, तर त्या पूर्वी आणि त्या नंतर देखील अर्णब यांनी घेतलेल्या प्रत्येक डिबेट शो मध्ये सामाजिक ऐक्य खराब करण्याचा आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पुणे पोलीस कमिश्नरांकडे दाखल केलेली ही तक्रार अशा अनेक डिबेट शो च्या विरोधात आहे. या तक्रारीत अशा अनेक टीव्ही शो चे दाखले विस्तृतपणे देऊन त्यांच्या लिंक सुधा देण्यात आल्या आहेत.

रिपब्लिक टीव्ही वरील हिंदी व इंग्रजी शो वर अर्णब गोस्वामी यांचे हावभाव, अविर्भाव, बॉडी लँग्वेज, त्यांचा आरडाओरडा तसेच विशिष्ठ राजकीय पक्षाची भूमिका घेणे, एखाद्या धर्माला आणि काही व्यक्तींना बदनाम करण्याची भ्रष्ट पत्रकारिता सातत्याने जाणविते. आपण कायद्याच्या वरचढ आहोत. अशी गुर्मी चढलेला, विध्वंसक पत्रकार गोस्वामीच्या रूपाने कायदा धाब्यावर बसवून पत्रकारितेच्या उद्देशाला काळिमा फसतो आहे. असे वारंवार दिसते. अशी खंत तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे.

डिबेटमध्ये आलेल्या पाहुण्यांचा अपमान, त्यांच्या अंगावर ओरडणे, त्यांना खोटे पाडणे आणि गोस्वामी यांच्या सारखे मत नसेल ते खोटारडेच आहेत. असे प्रस्थापित करणे.

या कारणांवरून अनेकदा त्यांच्या कार्यक्रमातून कित्येक पाहुणे उठून गेलेले आहेत. गोस्वामी यांचे अचानक चिडणे, ओरडणे आणि इतर कोणालाही बोलू न देणे. या वृत्तीला मानसिक आरोग्य संकल्पनेत Impulse Control Disorder म्हटले जाते. यामध्ये माणूस आपले नियंत्रण गमावतो, आपल्याविरोधात कुणी बोलले तर मानसिक संतुलन ढासळते आणि जोरजोरात ओरडायला लागतो.

त्याचे हावभाव, हातवारे बदलतात आणि तो इतर कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत राहत नाही. ही सगळी लक्षणे अर्णब गोस्वामी यांच्यामध्ये आहेत. यामुळे मुद्द्याला धरून बोलणे नाही, खऱ्या खोट्यात फरक न करता ते त्यांच्या रिपब्लिक टीव्ही वरून लोकांना चुकीची माहिती पुरवीत असतात. या सगळ्यांचा दर्शक, श्रोते यांच्यावरच नाही तर लोकशाहीच्या प्रक्रियेवर काय परिणाम होणार? याचा कोणताही विचार अर्णब गोस्वामी यांना करायचा नसतो. इतके ते बेजबाबदार पत्रकार आहेत. असे तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे अ‍ॅड.असीम सरोदे यांनी सांगितले.

गोस्वामी यांच्या प्रत्येक डिबेट शो मध्ये लोकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा, भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी अनेकवेळा उग्र, भडकाऊ आणि खोटे बोलणारे पाहुणे डिबेट मध्ये बोलवले जातात. शो मध्ये दाखवली जाणारी एखादी विडिओ क्लिप देखील अर्धीच दाखवली जाते. जेणे करून लोकांना केवळ सोयीस्कर व विशिष्ठ गोष्टीच दाखवल्या जातील. शो मध्ये वापरले जाणारे ग्राफिक्स, टॉप बँड, हॅशटॅग हे सगळे केवळ भावना भडकावणारे आणि विशिष्ठ व्यक्तींना बदनाम करणारे असतात. पत्रकारिता म्हणजे झालेली घटना केवळ लोकांच्या पुढे ठेवणे असते. एखाद्या घटनेला निवडक राजकीय, धार्मिक रंग देऊन, खोटी माहिती देऊन लोकांना प्रभावित करणे, भडकविणे, देशातील एकात्मता, बंधुभावाचे वातावरण नष्ट करण्याचे प्रयत्न म्हणजे अतिरेकीपणा पसरविणे आहे. याला पीत पत्रकारिताच म्हटले पाहिजे असेही तक्रारीत स्पष्टपणाने नमूद करण्यात आलेले आहे.

पत्रकारितेचे सगळे नियम धाब्यावर बसवून गोस्वामी हा डिबेट शो सातत्याने करीत आहेत. यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. लोक एकमेकांकडे द्वेषाने बघू लागले आहेत. एखाद्या संवेदनशील प्रसंगी देखील सरकारी सूचना आणि नियम डावलून गोस्वामी एकांगी आणि चुकीचे वार्तांकन करत राहिलेले आहेत. पातळी सोडून वापरलेली भाषा, मर्यादा ओलांडून केलेली वक्तव्ये यासाठी हा डिबेट शो ओळखला जातो. गोस्वामी यांनी एका शो मध्ये सचिन तेंडुलकर यांना देखील देशद्रोही म्हटलेले होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या मध्ये त्यांनी ठराविक व्यक्तींचा अपमान केलेला आहे.

या मध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शबाना आझमी, जावेद अख्तर आणि अनेक नावाजलेल्या व्यक्तींचा पातळी सोडून वारंवार अपमानास्पद उल्लेख केला आहे. असे तक्रारीत म्हटल्याचे निलेश नवलाख म्हणाले.

अशा पत्रकारितेला वेळीच थांबवण्याची गरज आहे. केबल टेलीव्हीजन नेटवर्क (नियमन) कायदा व त्यातील नियमांनुसार अशा प्रकारे वार्तांकन आणि कार्यक्रम करणाऱ्या वाहिन्या आणि व्यक्तींवर कारवाई केली जाते. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गोस्वामी यांच्या विरोधात सेक्शन १९ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई व्हावी ही मागणी या तक्रारी मध्ये करण्यात आली आहे.

गोस्वामी यांच्यावर या आधी देखील दखलपात्र गुन्ह्या अंतर्गत अनेक तक्रारी झालेल्या आहेत. परंतु केबल टेलीव्हीजन नेटवर्क (नियमन) कायदा १९९५ नुसार दाखल करण्यात आलेली ही पहिलीच तक्रार आहे. केबल टेलीव्हीजन नेटवर्क (नियमन) कायद्याच्या कलम १९ नुसार अर्णब गोस्वामी आणि त्यांची रिपब्लिक टीव्हीवाहिनी धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय किंवा प्रादेशिक गटांमध्ये किंवा जातींमध्ये किंवा समाजांमध्ये अशांतता, शत्रुत्व, व्देष आणि तणाव निर्माण करणे व सार्वजनिक शातंता भंग करण्यासाठी दोषी असल्याचे तक्रारदारांना प्रथमदर्शनी दिसले. त्यामुळे तक्रार केली.

टेलीव्हीजन नेटवर्क (नियमन) कायद्याच्या कलम ५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या विहित कार्यक्रम कोडचे (प्रोग्राम कोड) उल्लंघन अर्णब गोस्वामी व रिपब्लिक टीव्ही यांनी सतत केल्याने त्यांच्यावर याच कायद्याच्या कलम २० नुसार कारवाई करण्याचे अधिकार तसेच अश्या अपराधाची दखल घेण्याची कायदेशीर जबाबदारी पोलीस आयुक्तांवर आहे. कलम २० नुसार अश्या टीव्हीवरील प्रक्षेपणाला व्यापक जनहितासाठी थांबविणे, त्यावर बंदी आणणे हे अधिकार पोलीस आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना सुद्धा आहेत. जर अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्ही विरोधातील गुन्हा सिद्ध झाला तर कलम १६ (अ) नुसार पहिल्या गुन्ह्यासाठी त्यांना २ वर्षांपर्यंतचा कारावास किवा १००० रुपये दंड किवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. असे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

वारंवार काही तक्रारी गुन्हेगारी कायद्यानुसार दाखल होऊनही अर्णब यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झालेला आहे असे दिसत नाही उलट ते तशाच आवेशात आणि त्यांचेच बरोबर असल्याच्या अविर्भावात वावरताना दिसतात. सुधृढ, सशक्त, सर्वसमावेशक आणि प्रगत समाजाची निर्मिती करण्यामध्ये पत्रकारिता महत्वाचे काम बजावते. पण गोस्वामी यांच्या सारख्या व्यक्तींमुळे समाजाची घडी विस्कटते आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी ही कायदेशीर आवश्यकता आहे. अशी अपेक्षा तक्रारकर्ते निलेश नवलखा यांनी व्यक्त केली आहे.

Updated : 6 Jun 2020 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top