Home > News Update > शिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार, अॅड असिम सरोदेंचं नाव आघाडीवर

शिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार, अॅड असिम सरोदेंचं नाव आघाडीवर

शिर्डी संस्थानचं अध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार, अॅड असिम सरोदेंचं नाव आघाडीवर
X

गेल्या काही वर्षांपासून शिर्डी संस्थानचा कारभार प्रशासकीय मंडळाकडे आहे. सध्या शिर्डी संस्थानचा कारभार न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ समितीमार्फत पाहिला जात असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा शिर्डी संस्थानच्या अध्यक्ष पदी आता कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही वर्षातील अनुभव पाहता आता नागरिक हे पद राजकीय पक्षाकडे देऊ नका अशी मागणी करत आहेत. तसे न्यायालयाचे निर्देश देखील आहेत. त्यामुळे यावेळी शिर्डी संस्थानावर कोणाची वर्णी लागणार असा सवाल उपस्थित होत आहे.

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टीळक भोस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या संस्थानवर राजकीय नेत्यांच्या नियुक्तीला विरोध दर्शविला असून या संदर्भात सामाजिक क्षेत्रातील काही नाव सुचवली आहेत. त्यामध्ये घटनातज्ज्ञ आणि कायद्याचे विश्लेषक असीम सरोदे, बद्रीनाथ महाराज तनपुरे, निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, विधीज्ञ, शिक्षण क्षेत्रातील हेरंब कुलकर्णी, शेतकरी नेते डॉ. अजित नवले या व्यक्तींची नाव समोर आली आहेत.

या नावांमध्ये Adv. असिम सरोदे यांच्या नावाला मोठी पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. असिम सरोदे हे कायद्याचे जाणकार तर आहेतच. त्याचबरोबर त्यांचे सामाजिक कार्य देखील मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळताना दिसून येत आहे. या संदर्भात आम्ही असिम सरोदे यांच्याशी बातचीत केली असता, ते म्हणाले...

माझी नेमणूक झाली तर ती माझ्यासाठी आनंदाची बाब ठरेल. खऱ्या अर्थाने धार्मिकता निर्माण करण्याचे दमदार प्रयत्न शिर्डी संस्थानद्वारे केले जाऊ शकतात. अडल्या- नडल्या अनेक माणसांना माणुसकीचे जीवन जगण्यासाठी मदत करणे, बेरोजगारांना मदतीचा हात देऊन त्यांना सन्मानाने जगण्याच्या मार्गावर येण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे, पर्यावरणपूरक पद्धतीने उसत्वांचे साजरीकरण करणे, शिर्डीकडे येणारे सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी भक्तांनी दिलेल्या निधीचा वापर करणे, धुळमुक्त व आरोग्यदायक हवामान असलेली शिर्डी तयार करणे, शेतकरी कुटुंबाला पूरक सेवा सुरू करणे, अपारंपरिक शिक्षणातून लगेच कामाला लागतील असे कर्तृत्ववान हात तयार करणे असे काम सामूहिक प्रयत्नांमधून करता येईल.

शिर्डी संस्थानच्या आर्थिक सहभागातून शिर्डीजवळ चारही बाजुंनी निदान 20 एकरांचे जैवविविधता असणारे जंगल तयार करून ' ऑक्सिजन-सिटी' म्हणून शिर्डी विकसित करता येईल. टिळक बोस यांनी माझे नाव शिर्डी संस्थांवर घेण्यात यावे हे सुचविल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

असं मत असिम सरोदे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.

दरम्यान आता शिर्डी संस्थानावर स्वत:ची वर्णी लागावी म्हणून अनेक लोक देव पाण्यात घालून बसले आहेत. सत्ता वाटपानुसार हे संस्थान राष्ट्रवादीकडे आल्यानं या संस्थानाच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी म्हणून आमदार आशुतोष काळे, आमदार नीलेश लंके आग्रही असल्याचं समजतंय. त्यामुळं शिर्डी संस्थानाच्या अध्यक्ष स्थानी आता राजकीय व्यक्तीची निवड होते की सामाजिक कार्यातून समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तीची हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Updated : 13 Jun 2021 4:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top